`देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख`, भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, `निवडणूक पूर्ण होऊन..`
Devendra Fadnavis Riot Planning Allegations: देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपा नेते यावर व्यक्त होताना दिसत आहे.
Devendra Fadnavis Riot Planning Allegations: सोलापूरच्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरमध्ये दंगली घडवायला सांगितलं होतं, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या आहेत. मात्र प्रणिती शिंदेंनी केलेल्या या आरोपावरुन आता भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदवण्यास सुरुवात केली असून भाजपाच्या एका आमदाराने देवेंद्र फडणवीसांची बाजू घेताना त्यांचा उल्लेक देवमाणूस असा केला आहे. तसेच प्रणिती शिंदे एक महिना यासंदर्भात शांत का होत्या असा सवालही या आमदाराने विचारला आहे.
प्रणिती शिंदेंनी काय आरोप केले?
निवडणुकीमधील विजयानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये आयोजित कृतज्ञता मेळाव्यामध्ये प्रणिती शिंदेंनी दिलेल्या भाषणामध्ये फडणवीसांवर गंभीर आरोप केले. "अतिरेकी आणि भाजपावाल्यांमध्ये काहीच फरक नाही. निवडणूक हातून जात असल्याचं लक्षात आल्यानंतर धार्मिक वाद पेटवून दंगली घडवून निवडणूक जिंकण्याचा भाजपाचा डाव होता. मात्र जनतेनं निवडणूक हाती घेतली आणि लोकशाहीचा विजय झाला," असं प्रणिती म्हणाल्या. "लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पिलावळांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता. सोलापुरात निवडणुकीच्या दोन दिवस आधी दंगल लावणार होते. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे रक्ताने राजकारण करतात ही लोकं! गावागावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते, भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा, निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, म्हणजे कळेल, असं प्रणिती शिंदे आपल्या भाषणात म्हणाल्या.
फडणवीस देवमाणूस
प्रणिती शिंदेंनी केलेल्या या आरोपांवर प्रतिक्रिया देताना घाटकोपरचे भाजप आमदार राम कदम यांनी फडणवीसांची प्रतिमा राज्यात देवमाणूस अशी असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्यांनी प्राणिती शिंदेंना इतक्या दिवस तुम्ही शांत का होता? असा प्रश्नही विचारला आहे. प्रणिती शिंदेंनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देणारा एक व्हिडीओ राम कदम यांनी जारी केला असून त्यामध्ये त्यांनी, 'संपूर्ण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांची ओळख एक देवमाणूस म्हणून आहे. प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्याच्या शुभेच्छा त्यांना. पण महिनाभर तुम्ही कसली वाट पाहत होता? निवडणूक पूर्ण होऊन आता महिना होत आला. जर तुमच्या आरोपात काही तथ्य आहे तर तुम्ही का गप्प बसलात?' असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> अजित पवारांना पक्षात परत घेणार का? शरद पवारांचं मोजून 4 शब्दात उत्तर; म्हणाले, 'सवालही..'
रोज टीव्हीवर दिसण्याची सवय लागल्याने...
तर दुसरीकडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रणिती शिंदेंना टोला लगावताना. "रोज टीव्हीवर दिसण्याची सवय लागल्याने अशी स्फोटक वक्तव्य खासदार प्रणिती शिंदे करत असतात," असं म्हटलं आहे.