औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केल्यानंतर त्यांनी परिस्थिती पत्रकार परिषद घेऊन मांडली, यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेताची विदारक परिस्थिती पाहून झालेलं नुकसान पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येतं... शेतीची अतिवृष्टीने परिस्थिती अतिशय भीषण आहे, कापूस, सोयाबीन, मका, ऊस , डाळींब, केळी, कांदा अशी ही सर्व पिकं १०० टक्के खराब झाली आहेत. 


अस्मानी आणि सुल्तानी संकट - देवेंद्र फडणवीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक पैसा देखील शेतकऱ्यांना मिळणार नाही, अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी माती खरडली गेली आहे, तिथे शेतकऱ्यांना नवीन जमीन तयार करावी लागेल. काही ठिकाणी जमीन खरडली गेली नसली तरी गुडघाभर पाणी आहे. कापसाची बोंडे जवळून पाहिली तर खराब झाली आहेत, डाळींब काळी पडली आहेत. अस्मानी आणि सुल्तानी संकट आलं आहे. महाबीजचं बियाणं देखील बनावट निघालं आहे, आता त्यांनी काय करावं हा प्रश्न आहे. 


औरंगाबादेत झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ८० ते ९० टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याचं सांगितलं. पण मुख्यमंत्र्यांपर्यंत वास्तव पोहोचलेलं नाही. यात ६० ते ७० टक्के ठिकाणी अजूनही पंचनामे करण्यास कुणी आलेले नाहीत, काही ठिकाणी १०० टक्के नुकसान झालं असेल, तर ४० टक्के, ३० टक्के एवढीच नोंद झाली आहे.


अतिवृष्टीत नुकसान होत असतानाही, बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. शेतकऱ्यांकडून भयानक वसुली सुरु आहे. मुख्यमंत्र्यांनी त्वरीत अशा बँकांना सूचना देऊन वसुलीचा तगादा लावणे बंद करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे.


कुणी जीएसटीचं कारण सांगत असेल, तर मी स्पष्ट सांगतो, मागच्या वर्षाचे केंद्राचे जीएसटीचे देणे पूर्ण झाले आहे.  सरकारने जीएसटीचं रडगाणं गाऊ नये, शरद पवारांनी कर्ज घेण्याची सूचना केली, कर्ज घेणं काही नवीन नाही. सरकारनं पिकविम्याचे पैसे द्यावेत. 


मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३ हजार ८०० आणि ४ हजार रूपयाचे चेक वाटणे, ही शेतकऱ्याची थट्टा आहे, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणीही असो दिल्ली दरबारी सर्वांची पत असते, मी आहे आणि मोदीजी देतील आणि उद्धवजींना देणार नाहीत असं होत नाही. फक्त मागण्याचा मेमोरेंडम तयार झाला पाहिजे तो तयारच झाला नाही.