नागपूर: ज्याच्या जास्त जागा, त्याचा मुख्यमंत्री या न्यायाने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे वक्तव्य भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ते गुरुवारी नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर गडकरी यांनी म्हटले की, महाराष्ट्रातील परिस्थितीतून लवकरच मार्ग निघेल. भाजप आणि शिवसेनेला जनमताचा कौल मिळाला आहे. लवकरच यासंदर्भात निर्णय होईल. त्यासाठी शिवसेना सहकार्य करेल, असे गडकरी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालीच सरकार स्थापन झाले पाहिजे. भाजपला विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक १०५ जागा मिळाल्या आहेत. ज्यांनी जास्त जागा जिंकल्या त्याचा मुख्यमंत्री असतो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी म्हटले. 


'भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, शिवसेनेशी चर्चा सुरु'



यावेळी गडकरी यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असल्याचे वृत्तही फेटाळून लावले. मी महाराष्ट्रात येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 


तत्पूर्वी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेतही  भाजप अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, असे स्पष्ट केले. आम्हाला शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन करायचे आहे. साठी शिवसेनेसोबत काही स्तरांवर चर्चा सुरु आहे. मात्र, प्रसारमाध्यमांकडून दाखवल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे शिवसेना आणि भाजपमधील चर्चा बंदच असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले.


तुम्हारे पांव के नीचे कोई ज़मीन नहीं.... राऊतांचे आणखी एक ट्विट


तसेच आज भाजप नेत्यांची राज्यपालांशी होणारी भेट ही सरकार स्थापनेसाठी नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात स्थिर सरकार आणण्याच्यादृष्टीने भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. सरकार स्थापनेचा निर्णय हा राज्यपालांशी घटनात्मक तरतुदींवर चर्चा केल्यानंतरच घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.