मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एका रात्रीत खळबळजनक घटना घडल्या आहेत. कालपर्यंत महाशिवआघाडीचे सरकार येणार हे जवळपास निश्चित असताना आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्वात राष्ट्रवादीच्या भुमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. एका रात्रीत हे समीकरण बदललेलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि नड्डा यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या बाजुने कौल दिला होता. पण आमचा मित्रपक्ष असलेला शिवसेनेने एकत्र न येता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मोट बांधली. यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन आले. एक खिचडी होण्याचा प्रकार सुरु होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी आम्हाला समर्थन दिले. अन्य काही नेत्यांनीही आम्हाला पाठींबा दिला. राज्यपाल आम्हाला बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र देतील आम्ही बहुमत सिद्ध करु असा विश्वास मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 



महाराष्ट्रासमोर जी आव्हाने आहेत त्याचा सामना आम्ही समर्थपणे करु, शेतकऱ्यांच्यामागे खंबीरपण उभे राहण्याचे काम आम्ही करु. खरं वचन आम्ही जनतेला दिले होते. पण या वचनाचा भंग झाला आणि आमच्याऐवजी दुसऱ्यांसोबत जाण्याचा प्रकार झाला असा टोला त्यांनी शिवसेनेला लगावला. 



चर्चेला कंटाळून भाजपा पाठींबा देण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. २४ तारखेला निकाल आल्यानंतर कोणीही सरकार बनवू शकले नाही. गेली १ महिना केवळ चर्चाच सुरु होती. यातून कोणताही मार्ग निघत नव्हता. चर्चांमध्ये केवळ मागण्या वाढत होत्या. 


कोणीतरी दोघांनी एकत्र आल्याशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही हे स्पष्ट होत म्हणून या पद्धतीचा निर्णय आम्ही घेतल्याचे अजित पवार म्हणाले.