Devendra Fadnavis : देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र... आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं पुन्हा एकदा आपले दोन्ही हुकमी एक्के मैदानात उतरवण्याची तयारी केलीय.. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपची संपूर्ण जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेच्या जागा ठरवण्याचे अधिकार फडणवीसांकडे असतील. मतदारसंघात फेरबदल करण्याचे अधिकारही त्यांनी देण्यात आल्याचं समजतंय पक्षांतर्गत उमेदवार आणि मतदारसंघ निश्चितीची जबाबदारीही त्यांच्यावरच असेल. महायुतीतल्या मित्रपक्षांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे अधिकारही फडणवीसांकडे असणार आहेत.


लोकसभा निवडणुकीत फडणवीसांना सर्वाधिकार देण्यात आले नव्हते. त्याचा फटका भाजपला बसला... यंदा लोकसभेला भाजपचे 48 पैकी केवळ 9 खासदार विजयी झाले. त्यामुळं विधानसभेला फडणवीसांनाच सर्वाधिकार बहाल करण्याचा निर्णय केंद्रीय भाजप नेतृत्वानं घेतल्याचं समजतंय..


अनुभव आणि आक्रमकता या फडणवीसांच्या जमेच्या बाजू आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मातब्बर विरोधकांना थेट भिडणारा फडणवीसांच्या ताकदीचा पर्यायी नेता भाजपकडे नाही. 2019 मध्ये फडणवीसांकडे निवडणुकीचे सर्वाधिकार असताना भाजप-शिवसेना युतीचे 42 खासदार विजयी झाले होते


2019 विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आणण्यात फडणवीसांचा मोठा वाटा होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरून बिनसलं आणि युती तुटली आता पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, रिपब्लिकन पक्ष आणि अन्य छोट्या मित्रपक्षांची मोट बांधण्याची किमया फडणवीसच करू शकतात.


2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं 152 जागा लढवल्या होत्या.. यंदा देखील भाजपनं 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, यासाठी मिशन 150 निश्चित करण्यात आलंय... महाराष्ट्राचे भाजप प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत कोअर कमिटीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.. त्यानुसार जागावाटपापासून उमेदवार ठरवण्यापर्यंत आणि निवडणूक प्रचारापासून सरकार बनवण्यापर्यंत फडणवीस यांनाच फ्रंटफूटवर येऊन बॅटिंग करण्याची संधी भाजप नेतृत्वानं दिलीय... या संधीचं सोनं करण्याची आणि विजयाची पुनरावृत्ती घडवण्याची जबाबदारी फडणवीसांवर असणाराय..