धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (Tulja Bhavani Temple) तिजोरीतील सोने-चांदीच्या दागिन्यांची मोजदाद अलीकडेच पूर्ण झाली आहे. भाविकांनी आईच्या चरणी 207 किलो सोने, 2570 किलो चांदी तर 354 हिरे अर्पण केले आहेत. मात्र मोजदादी दरम्यान काही धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. आई तुळजाभवानीला मोठ्या श्रद्धेने दान केलेले सोने अशुद्ध असल्याचे समोर आले आहे. (Tulja Bhavani Temple Gold)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाविक मोठ्या श्रद्धेने आई तुळजाभवानीला वेगवेगळे सोन्या, चांदीचे मौल्यवान दागिने अर्पण करतात. याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थान ठेवत असतात. भक्तांनी दान केलेलं हे सोन केवळ पन्नास टक्केच शुद्ध असल्याचं मोजदादीमध्ये उघड झाले आहे.


कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला दान केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान दागिन्याची मोजदाद नुकतीच पूर्ण झाली आहे. भक्तांनी आई तुळजाभवानीच्या चरणी 207 किलो सोने तर 2570 किलो चांदी अर्पण केली आहे. एवढेच नाही तर भक्तांनी तुळजाभवानी चरणी 354 हिरे देखील अर्पण केले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या मोजदादीमध्ये ही माहिती पुढे आली आहे. भक्ताने दान केलेल्या 207 किलो सोन्यापैकी केवळ 50% म्हणजे 111 किलो सोने शुद्ध असल्याचं उघड झाला आहे


तुळजाभवानी चरणी दान केलेलं सोनं अशुद्ध असल्याचे लक्षात येताच आता यापुढे भक्तांनी दान केलेल्या सोन्याची शुद्धता तपासली जाणार आहे. यासाठीची यंत्रणा मंदिर संस्थांच्या वतीने लवकरच कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थेचे विश्वस्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे.


दरम्यान, तुळजाभवानीला दान केलेल्या सोन्याची शुद्धता तपासली जाणार असल्यामुळे यापुढे देवीला दान केलेल्या सोन्या-चांदीच्या मौल्यवान वस्तू शुद्ध आहे की मिश्रित आहे. हे तात्काळ लक्षात येणार आहे, असंही त्यांनी सांगितले. 


तुळजाभवानीच्या तिजोरीच्या मोजदादीची प्रक्रिया 15 दिवस सुरू होती. 25 लोकांकडून ही मोजदाद सुरू होती. 2009पूर्वी तुळजाभवानीला 81 किलो सोन्याचे दान करण्यात आले होते. त्यानंतर हे सोने वितळण्यात आले होते. यावेळीदेखील सोने वितळवण्याची प्रक्रिया होणार आहे. 15 वर्षांनंतर भाविकांनी देवीच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीची देवस्थानाकडून मोजदाद करण्यात आली हे. 


354 हिरे आढळले


कडेकोट सुरक्षेत तसेच कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली ही मोजदाद सुरू होती. देवीच्या तिजोरीत ३५४ हिरे आढळून आले आहेत. या हिऱ्यांची किंमत अंदाजे २० लाख रुपये इतकी आहे. देवीला इतक्या मोठ्या प्रमाणात दागिने येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे. 


हायटेक यंत्रणा उभारणार 


तुळजाभवानी मंदिरासाठी प्रसाद योजनेतून एक हजार कोटींचा नवा आराखडा तयार करण्यात येणार आहे. शिर्डी आणि तिरुपती बालाजी देवस्थानाप्रमाणे तुळजाभवानी मंदिरात हायटेक यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. मंदिरातील वाढती गर्दी पाहता भाविकांना सर्व सोयी मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.