`चिक्की` नंतर पंकजा मुंडेंवर मोबाईल गैरव्यवहाराचा धनंजय मुंडेंचा आरोप
चिक्की गैरव्यवहारानंतर आता पंकजा मुंडे यांच्यावर मोबाईल गैरव्यवहाराचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.
मुंबई : चिक्की गैरव्यवहारानंतर आता पंकजा मुंडे यांच्यावर मोबाईल गैरव्यवहाराचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका यांना अँड्रॉईड फोन घेण्याला महिला आणि बालविकास खात्याने मंजुरी दिली. मात्र यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप मुंडे यांनी केला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषदेत हे आरोप केले आहेत. त्यामुळे मुंडे भाऊ-बहिण यांच्यातील काही दिवस शांत असलेले वातावरण पुन्हा बिघडणार आहे.
१ लाख २० हजार ३३५ फोन विकत घेण्याचा निर्णय सरकारने घेतला. ८ हजार ७७७ रूपये या दराने मोबाईल फोन विकत घेतले. त्यासाठी १०६ कोटी ८२ लाखांचा खर्च करण्यात आला. मात्र बाजारात हा फोन ६ हजार ते सहा हजार चारशे रूपयांना ऑनलाईन मिळतो असा दावा धनंजय मुंडे यांनी केला आहे. जो फोन मार्केटमध्ये चालला नाही तो पॅनासॉनिक अलोगा आय ७ हा फोन घेण्याचा घाट सरकारने का घातला ? असा सवाल मुंडे यांनी केला आहे. मायक्रोमॅक्स कंपनी 46 लाख रुपयात 1 लाख 20 हजार मोबाईल द्यायला तयार होती असा दावा त्यांनी केला आहे. बंगलोरच्या सिसटेक कंपनीला मोबाईल पुरवण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. हे पैसे कोणाच्या खात्यात गेले ? असा सवाल त्यांनी विचारला आहे. या सर्व आरोपाला पंकजा मुंडे काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आता निवडणुकीच्या तोंडावर 30 ते 40 कोटींचे मोबाईल 106 कोटी रुपयाला घेतले. ठराविक कंपनीला फायदा देण्यासाठी महिला आणि बाल विकास विभागाने हा निर्णय घेतल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. आम्ही एवढे घोटाळे काढले पण मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मंत्र्याला तुम खाते रहो हम सभालते रहेंगे असे सांगितले असेल असेही ते म्हणाले. त्यामुळे या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली.