आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक; बोलावली बैठक
धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे.
पुणे : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असतानाच आता धनगर समाजही आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी ५ ऑगस्टला पुण्यात कृती समितीने बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते उपस्थित असतील. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. बारामतीमधील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत ५ ऑगस्टला बैठक बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. धनगर समाजातील सर्वपक्षीय नेते, आजी-माजी आमदार-खासदार आणि सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. धनगर समाजाचा समावेश आदिवासींमध्ये करण्यात यावा ही प्रमुख मागणी असेल. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न गाजत आहे. यासाठी राज्यभर मराठा मोर्चाकडून आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. आजच लातूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाने बैठक घेऊन १ ते ९ ऑगस्टदरम्यान राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलय ...
शिवसेना आमदारांची 'मातोश्री'वर बैठक
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची आज (सोमवार, ३० जुलै) बैठक बोलावली आहे.. दुपारी १२ वाजता मातोश्रीवर ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची मतं पक्षप्रमुख जाणून घेणार आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसनेही बोलावली बैठक
दरम्यान, मराठा आरक्षण आणि त्यासाठी राज्यभर पेटलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज मुंबईत बैठक होत आहे. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विधानभवनात होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या स्वतंत्र बैठका पार पडल्यानंतर दोन्ही पक्षांची एकत्र बैठकही होणार आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारवर कशा प्रकारे दबाव टाकायचा. त्याचबरोबर राज्यभर सुरू असलेल्या मराठा आंदोलनासंदर्भात काय भूमिका घ्यायची याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.