लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड: आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून परळी विधानसभा मतदारसंघात बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्यातच सामना रंगणार हे चित्र स्पष्ट झाले आहे. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी उपस्थित हजारो परळीकरांना भावनिक आवाहन करताना ही माझी जीवन-मरणाची निवडणूक आहे. इतकी वर्ष लेकीला साथ दिली. यावेळी मला पदरात घ्या, असे सांगत आपली उमेदवारी जाहीर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभर शिवस्वराज्य यात्रा सुरू असून ही यात्रा परळी येथे आल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणात उपस्थित परळीकरांना भावनिक साद घातली. गेल्या दहा वर्षापासून तुम्ही लेकीला म्हणजेच पंकजा मुंडे यांना मतदान करताय. मात्र, परळीचा हवा तेवढा विकास झालेला नाही. मतदारसंघात सिंचन किंवा उद्योगाचे प्रकल्प आले नाहीत. परंतु, मी विरोधी पक्षात असतानाही मोठमोठ्या योजना केचून आणल्या. इतकी वर्षे तुम्ही लेकाला साथ दिली. मात्र, यंदाची निवडणूक माझ्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे यावेळी मला पदरात घ्या, असे भावनिक आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.


यावेळी व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, परळीचा कायापालट करू, असा शब्द दिला. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने राज्यभर हालचाली सुरू आहेत. परळीतही पुन्हा एकदा बहीण-भावाचा सामना पाहायला मिळेल. मात्र, यावेळी परळीकर कोणाच्या पारड्यात दान टाकणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.