मुंबई : माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पूत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता त्यांचे कट्टर विरोधक असलेले चुलत बंधू आणि शिवसेना नेते धवलसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर आहेत. त्यासाठी आज त्यांनी बैठक घेतली. दरम्यान, धवलसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी मुंबई येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची अकलूज येथे बैठक बोलावली होती. तर दुसरीकडे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंह मोहिते पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ऊदधव ठाकरे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिली. दरम्यान, त्यांनी वर्षभरापूर्वीच शिवसेनेचा राजीनामा दिला होता. ते एक-दोन दिवसांत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूरमधील अकलूज येथील त्यांच्या प्रतापगड या बंगल्यावर आज कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता होणार, अशी चर्चा होती. दरम्यान, बैठकीत काय ठकले याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. धवलसिंह मोहिते पाटील हे रणजितसिंह मोहिते पाटील यांचे चूलत बंधू असून या दोन चूलत भावांमध्ये शत्रूत्व आहे. 



राज्याचे माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे धवलसिंह हे चिंरजीव आहेत. मोहिते कुटुंबीयाचा वाद जिल्ह्यासह महाराष्ट्राला माहीत आहे. राज्याचे माजी उपमूख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि प्रतापसिंह मोहिते पाटील हे सख्खे बंधू असले तरी या दोन भावांच्या कूटूंबाचे कधीच पटले नाही. मोहिते पाटील यांच्या कुटुंबातील वाद टोकाला गेला आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे  शिवसेनेचे सहसंपर्क नेते होते. मोहिते पाटील यांच्या पाठीमागे तरुणांची मोठी फौज आहे. तसेच स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांची फळी देखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे भविष्यात याचा फायदा हा राष्ट्रवादीला निश्चित होणार आहे, अशी चर्चा आहे.