प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातील साक्री येथे सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. दरोडेखोरांनी तरुणीला घेऊन पळ काढल्याने पोलिसांनी तात्काळ शोध सुरु केला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. मात्र आता याप्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. पोलिसांनी दरोडेखोरांनी पळवून नेलेल्या मुलीचा शोध लावला आहे.  तरुणीला पोलिसांनी मध्य प्रदेशातील सेंधवा येथून ताब्यात घेतलं आहे. ही तरुणी सुखरूप असून ती भेदरलेल्या अवस्थेत होती. पण तिच्याकडे केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साक्री येथील विमलबाई महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या दौलत बंगल्यात 25 नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. बंगल्यातील ज्योत्स्ना पाटील यांना दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण करत  सोने,चांदीच्या दागिन्यांसह 88 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लुटला. त्यानंतर दरोडेखोरोंनी ज्योत्स्ना यांचे हात-पाय आणि तोंड बांधले. हा सगळा प्रकार घडला तेव्हा जोत्सा यांची भाची निशा शेवाळे ही देखील होती. दरोडेखोरांनी हत्यार दाखवत तिला घेऊन पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि निशाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र निशाचा शोध लागला आणि धक्कादायक सत्य समोर आलं.


निशा शेवाळे या तरुणीने आपल्या प्रियकरा सोबतच बनावट दरोड्याचा आणि अपहरणाचा कट रचल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आलेली आहे. 25 नोव्हेंबर रोजी निशा शेवाळे ही तिच्या आत्याकडे आली होती. दरोडा पडला आणि निशाचे अपहरण दरोदेखोरांनी केले. या घटनेने पोलिसही हादरून गेले होते. मात्र पोलीस तपासात आत्याकडे राहायला गेली निशाने तिचा प्रियकर विनोद नाशिकर याच्या मदतीने स्वतःचा अपहरणाचा आणि दरोड्याचा कट रचल्याचे समोर आले आहे. 


पोलिसांनी या प्रकरणी निशा आणि तिच्या प्रियकरा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विनोदने आपल्या चार साथीदारांसह ज्योत्स्ना यांच्या घरी दरोडा टाकला होता. त्यात दागिने आणि रोकड लंपास केली. यासोबत निशाचे अपहरणही केले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि निशाचा शोध लावला. सुरुवातीला निशा उडाव उडावीची उत्तर देत होती. मात्र पोलिसांनी तांत्रिक मुद्द्याच्या आधारे तपास केल्यावर निशानेच आपल्या प्रियकर विनोदला हाताशी घेत दरोडा आणि अपहरणाचा कट रचल्याचे समोर आले. निशाला हा कट रचताना घटनेचे गांभीर्य लक्षात आले नाही. मात्र पोलिसांनी सखोल तपास केल्यावर सर्व वास्तव समोर आले आहे. पोलिसांनी मुख्य संशयितना ताब्यात घेतले असून, हरियाणा राज्यातील चौघे साथीदारांचा शोध घेत आहेत.