`मुलीचं कर्तव्य काय असतं हे...`; अखेर गौतमी पाटीलने स्विकारली वडिलांची जबाबदारी
Gautami Patil : गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गौतमी पाटीलने आपल्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे बोलावून घेतले आहे.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : लावणी नृत्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या गौतमी पाटीलने (Gautami Patil) अखेर तिच्या वडिलांची जबाबदारी स्विकारली आहे. गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात (Dhule) बेवारस आणि खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्यानंतर ही बातमी गौतमी पर्यंत पोहोचल्यानंतर तिने वडिलांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचं ठरवलं आहे. गौतमी पाटीलच्या वडिलांना आता उपचारासाठी पुणे (Pune) येथे हलवण्यात आले आहे. गौतमी पाटीलने एका व्हिडीओच्या माध्यमातून आपण वडिलांवर शक्य तितके उपचार करणार असल्याचे म्हटलं आहे.
दोन दिवसांपूर्वी गौतमी पाटील हिचे वडील रविंद्र बाबूराव नेरपगारे पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरुन ते गौतमी पाटील तिचे वडील असल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान प्रसार माध्यमांमध्ये बातम्या आल्यानंतर आपले वडील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून प्रकृती गंभीर असल्याचे कळताच गौतमी हिने धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांच्याशी संपर्क साधला व त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सांगितले होते.
गौतमीच्या सांगण्यावरुन त्यांना आता पुढील चांगल्या उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्यावरील उपचार स्वतःच्या देखरेखीत व स्वखर्चाने पुणे येथे करणार असल्याचे गौतमीने स्पष्ट केले आहे. गौतमी ही लहानपणापासूनच तिच्या मामांकडे वाढली आहे. मात्र वडील म्हणून रवींद्र पाटील यांनी कोणतेही कर्तव्य बजावलेले नाही. तरीही गौतमी पाटीलने पुढे येत मुलीचे कर्तव्य बजावत असल्याचे गौतमीचा मावशी सुरेखा पाटील यांनी यावेळी सांगितले.
"सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या काही तरुणांना एक व्यक्ती त्यांना बेवारस अवस्थेत सापडला होता. त्या व्यक्तीला हिरे महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. त्या व्यक्तीचे आधारकार्ड तपासले असता ती व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील असल्याचे कळले. त्यानंतर ही बातमी पसरली आणि गौतमी पाटीलने मला संपर्क केला. गौतमीने तिच्या मावशीला रुग्णालयात पाठवलं. त्यानंतर गौतमीने मला वडिलांना चांगल्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. वडिलांचे चांगल्या पद्धतीने उपचार व्हावीत अशी गौतमीची इच्छा आहे. मुलीचं कर्तव्य काय असतं हे गौतमीच्या भूमिकेतून दिसत आहे. प्रकृती स्थिर असल्यास वडिलांना पुण्याला पाठवून द्या असे तिने सांगितले आहे. याच्या पुढचे सगळे उपचार करण्याची जबाबदारी मुलगी म्हणून मी स्विकारते असे गौतमीने सांगितले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रविंद्र पाटील यांना पुणे येथे हलवण्यात येत आहे," असे धुळ्याच्या माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी सांगितले.