प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे : धुळ्यातील (Dhule)पोटाळी गावातील एका शेतकर्‍याच्या पोटातून तब्बल एक किलो वजनाचा मुतखडा (kidney stone) काढण्यात डॉक्टर आशिष पाटील यांना यश आले. डॉक्टरांच्या कामगिरीमुळे या रुग्णाला नवीन जीवदान मिळाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉक्टर आशिष पाटील यांनी रुग्णावर अतिशय गुंतागुंतीची  शस्त्रक्रिया करुन हा एक किलोचा मुतखडा काढला. या कामगिरीची नोंद इंडिया बुक आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.


धुळे शहरातील साक्रीरोडवर डॉ.आशिष पाटील यांचे तेजनक्ष रुग्णालय आहे. डॉ.पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या अवघड शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. रुग्ण रमन चौरे (50, रा.पाटोळी जि.नंदुरबार) यांना वारंवार लघवीचा आणि पोट दुखीचा त्रास होत होता. अनेक डॉक्टरांकडे त्यांनी याबाबत उपचार घेतले, विविध तपासण्या केल्या. मात्र त्यांना कोणताही फरक पडला नाही.


त्यानंतर धुळे येथील डॉ.आशिष पाटील यांच्या युरोलॉजी सेंटरमध्ये रमन चौरे यांनी उपचार घेण्यास सुरुवात केली. विविध तपासण्याअंती मुत्रपिंडात मोठा गोळा असल्याचे निष्पन्न झाले. डॉ.पाटील यांनी रमन चौरे यांच्यावर खुली शस्त्रक्रिया केली. 


यावेळी चौरेंच्या पोटातून सुमारे एक किलो वजनाचा मुतखडा निघाला. या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून डॉ.आशिष पाटील यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत दोन नवीन विक्रमांची भर घातली आहे. 


डॉ.पाटील यांच्याकडे आता तीन इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, दोन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड, दोन लिमका बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, रिप्लेज बिलीव्ह ऑर नॉट यासह 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहेत. तसेच मुत्र रोग चिकित्सेतील विविध संशोधनांचे पाच पेटंट मिळवणारे डॉ.पाटील हे भारतातील एकमेव डॉक्टर ठरले आहेत.


गेल्या 20 ते 30 वर्षांपासून हा मुतखडा त्याच्या युरीनरी मूत्राशयामध्ये होता. मुतखडा जेवढा छोटा असेल तेवढा त्रास जास्त होतो. तो किडनीमध्ये आला तर आणखी त्रास होतो. मात्र एकदा का मुतखडा मोठा झाला तर त्याचा त्रास कमी होतो. मॅग्नेशियम आणि पोटेशमची कमतरता असेल तर हा मुतखडा मूत्राशयामध्ये जमा होत असल्याचे डॉक्टर पाटील म्हणाले.


चौरे यांची ही शस्त्रक्रिया अत्यंत अवघड होती, कारण  त्यांच्या पोटातला गोळा हा तब्बल एक किलो वजनापर्यंत पोहोचला होता. अशा परिस्थितीत डॉक्टर आशिष पाटील यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करत त्यांना बरे केले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असून, लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी जाता येणार आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली.