राईनपाडा सामूहिक हत्याकांड; मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार...
सर्वानुमते जो निर्णय होईल त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात येतील, असा निर्णय मयत भारत भोसले यांचा मुलगा संतोष भोसले याने सांगीतला आहे.
धुळे: राईनपाडा प्रकरणातील पाच जणांना ठेचून मारल्याप्रकरणी नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सर्वानुमते जो निर्णय होईल त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात येतील, असा निर्णय मयत भारत भोसले यांचा मुलगा संतोष भोसले याने सांगीतला आहे. पाचही मयतांचे शवविच्छेदन मध्यरात्री करण्यात आले आहे. मृतदेह रात्रीच नातेवाईकांनी ताब्यात घ्यावे असा प्रयत्न पोलीसांचा होता. मात्र नातेवाईकांनी त्याला स्पष्ट नकार दिला आहे.
सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करा
धुळे मारहाण मृत्यू प्रकरणी पचंवीस लाखाची मदत आणि सरकारी नोकरीच्या आश्वासनासह, सरपंच तसंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी, हत्याकांडातल्या मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. तसंच प्रशासनावरही त्यांनी रोष व्यक्त केला आहे.
आतापर्यंत २३ जणांना अटक
दरम्यान, राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या धुळे येथील राईनपाड्यातल्या गावकऱ्यांनी केलेल्या मारहाण प्रकरणी आतापर्यंत २३ जणांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय. आणखी काहींची ओळख पटल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. तसंच, मारहाणीनंतर फरार झालेल्या गावकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथकं रवाना करण्यात आल्याचंही पोलिसांनी म्हटलंय. सोशल मीडीयातील अफेवमुळे झालेल्या हत्येमुळे राईनपाडा गाव देशभरात चर्चेत आलंय. रविवार संध्याकाळपासून गावात शुकशुकाट आहे. गावातले पुरुष फरार आहेत. अनेक घरांना कुलपं लागलीयत. राईनपाडा गावात मुलं पळवणारी टोळी शिरल्याची अफवा पसरल्यावर सोलापूर जिल्ह्यातल्या एकाच कुटुंबातल्या पाच जणांना गावात जमावानं अमानुष मारहाण केली. त्यात पाचही जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर गावात सध्या भयाण शांतता आहे.