`पुरंदरे यांचे लिखाण विकृत`; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जयसिंगराव पवार वक्तव्यावर आजही ठाम
Jaysingrao Pawar : पुरंदरेंचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केले नाही, असे जयसिंगराव पवार यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे. राज ठाकरेंच्या भेटीनंतर त्यांनी हा खुलासा केला आहे.
Babasaheb Purandare : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. याआधी त्यांनी कोल्हापुरात ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांची घरी जाऊन भेट घेतली होती. आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी (Maratha) किंवा ब्राह्मणांनी (Bramhan) लिहिलेला नाही. मोगल, पोर्तुगीज, ब्रिटिशांकडून या गोष्टी आल्या, असे विधान राज ठाकरे यांनी या भेटीनंतर म्हटले होते. यानंतर जयसिंगराव पवार (Jaysingrao Pawar) यांनी राज ठाकरे सोबतच्या भेटीविषयी खुलासा केला आहे. या संदर्भातील एक निवेदन सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
राज ठाकरे यांनी जयसिंगराव पवार यांच्यासोबतच्या भेटीत वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत चर्चा केली. "याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरं असल्याचं सांगितलं," असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर जयसिंगराव पवार यांच्यातर्फे निवेदन जारी करण्यात आले आहे.
राज ठाकरेंसोबत तिहासातील विविध विषयांवर चर्चा
"राज ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यामध्ये माझी भेट घेण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ते माझ्या निवासस्थानी आले. तेव्हा इतिहासातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यावेळी प्रत्यक्ष इतिहास आणि त्याचा चित्रपटांतून होणारा विपर्यास यावर चर्चा झाली, असे जयसिंगराव पवार यांनी म्हटले आहे.
माध्यमांमध्ये माझ्या विधानाची अतिशयोक्ती - जयसिंगराव पवार
"मी प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याला उजाळा देऊन आजच्या काळाच्या संदर्भात त्यांच्या कार्याचे महत्त्व विशद केले. प्रबोधनकारांचा विचार घेऊन मुख्यमंत्री म्हणून सत्तेत आल्यावर आपण महाराष्ट्रात धडाकेबाज काम कराल, त्याचे मी स्वागत करेन असे मी म्हणालो. माध्यमांमध्ये या विधानाची अतिशयोक्ती झाली. यावेळी त्यांच्याशी बाबासाहेब पुरंदरेंवर काहीही चर्चा झाली नाही," असे जयसिंगराव पवार यांनी स्पष्ट केले आहे.
'पुरंदरे यांचे लिखाण विकृत असल्यावर आजही ठाम'
"राज ठाकरे निघून गेल्यावर पत्रकारांनी पुरंदरेंबद्दल प्रश्न विचारल्यावर मी त्यांचा इतिहासकार म्हणून गौरवीकरण करणारे विधान केलेले नाही. कारण आतापर्यंत लिखाणातून व संशोधनातून पुरंदरे यांच्या विकृत व अनैतिहासिक मांडणीवर अभ्यासपूर्ण टीका केली आहे आणि त्यावर आजही ठाम आहे. या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे माझ्या वैचारिक भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून मी हा खुलासा देत आहे," असे जयसिंगराव पवारांनी नमूद केलं.