Disha Salian Case SIT Nitesh Rane Slams Aditya Thackeray: दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी (Disha Salian Death) भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. नितेश राणेंनी ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार दिशा सालियन प्रकरणामध्ये चौकशीसाठी विशेष गटाची स्थापना करण्याचे निर्देश आज जारी करु शकते. याच पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी झालेल्या नितेश राणेंनी, "आम्ही तिसऱ्या गिअरवर गाडी टाकली आहे. खरा खूनी आहे जो काल विधानसभा परिसरात दिसला त्याच्यावर लवकर कारवाई होईल", अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना नोंदवली. आजच मुंबई पोलिसांनी विशेष चौकशी समिती अर्थात एसआयटी स्थापन करावी अशी सूचना केली आहे. त्याबाबत राज्य सरकार आजच एसआयटीची घोषणा करु शकते.


आम्हाला समोरासमोर बसवा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितेश राणेंनी याच एसआयटी प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. आपल्याला आणि आदित्य ठाकरेंना समोरासमोर बसवून चौकशी करावी असंही नितेश राणे म्हणालेत. "काल खरा खूनी आपल्या वडिलांसोबत आला होता. सर्वांची उत्तरं या निमिताने बाहेर येणार आहेत. मी देखील थांबलोय. एसआयटी स्थापन झाल्या झाल्या आदित्य ठाकरे यांच्यासोबत मलादेखील बोलवा. आदित्य आणि मला समोरा समोर बसवा," असं नितेश राणे म्हणालेत.


अनिल परब यांचा उल्लेख


अनिल परब स्वतः म्हणाले होते की 13 जूनला पार्टी होती. त्यांना देखील एसआयटी चौकशीत बोलवावे. दोन वेळा क्लोजर रिपोर्ट बदलला आहे. आयोगाला अनिल परब याचे मालवणीत फोन येत होते की साक्ष बदला, असा खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


दिशा सालियन प्रकरण काय?


2020 मध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एकेकाळची मॅनेजर दिशा सालियनचा सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवसांआधी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्येचं असल्याचं म्हटलं गेलं होतं. त्यानंतर पुढे या प्रकरणाला राजकीय वळण लागलं आणि दिशावर सामूहिक बलात्कार करून हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला.



बलात्काराचाही आरोप


नारायण राणेंनी 2022 मध्ये ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर दिशा सालियानच्या आई-वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलेला. याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावलं होतं. दोघांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडलं होतं. नितेश राणेंनीही वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आदित्य ठाकरे कुठे होते? या प्रकरणाशी त्यांचं काय कनेक्शन आहे अशापद्धतीचे प्रश्न विचारले होते.


अनेक गंभीर आरोप


बऱ्याच वादानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास करून आपला अहवाल सादर केलेला. दिशा सालियन प्रकरणामुळे 2021 आणि 2022 मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले.