अहमदनगर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दुधबंद आंदोलनाला अहमदनगर जिल्ह्यातही सुरवात झाली आहे. रात्री साईबाबा मंदीराजवळ साईंच्या मूर्तीला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली. आंदोलनानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवी मोरे यांच्यासह पाच कार्यकर्त्यांना पोलीसांनी अटक केली. दरम्यान, या आंदोलनास सहभागी होऊ नये म्हणून किसान सभेच्या कर्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलीये. 


दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलय. अमरावतीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर पेटवून दिला. हा टँकर नागपूरला दूध नेत होता. दूध दरात पाच रुपयांची वाढ करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकर संघटनेनं लावून धरलीय. त्यासाढी १६ जुलैपासून शहरांचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. 


जलसंपदा मंत्र्यांकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला इशारा


दुधाच्या दराबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील याबाबत अनुकूल आहेत. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आपली भूमिका सोडायला तयार नाहीत. दूध दराबाबतचं आंदोलन हिंसक होऊ नये याबाबतची काळजी नेत्यांनी घ्यावी. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ देऊ नये. तसं केलं तर कारवाई अटळ असून, सरकार हातावर हात धरून बसणार नाही असा सज्जड दम जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांना भरलाय.