सांगली : अभिनेता अक्षयकुमारच्या  (Akshay Kumar) गब्बर इज बॅक (Gabbar is Back) या सिनेमातला सीन तुम्हाला आठवतोय. रुग्णालयात एका मृत व्यक्तीवर खोटे उपचार केल्याचं दाखवत मृताच्या कुटुंबियांकडून पैसे उकळण्याचं दृश्य या सिनेमात दाखवण्यात आलं होतं. पण हा सीन प्रत्यक्षात घडलाय आणि तो ही महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगलीतल्या इस्लामपुरमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस उपचार सुरु असल्याचं सांगत रुग्णाच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत हेल्थ केअरचा डॉक्टर योगेश वाठारकर याला अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.


नेमकी घटना काय?


डॉ. योगेश वाठारकर याचं शहरात बस स्थानकाजवळ माणकेश्वर चित्र मंदिर परिसरात आधार हेल्थ केअर आहे. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत. 24 फेब्रुवारी रोजी सलीम शेख यांनी त्यांची आई सायरा ( वय 60) यांना उपचारासाठी आधार हेल्थ केअर मध्ये दाखल केले होते. डॉ. योगेश वाठारकर याने उपचार केले. रुग्ण सायरा यांच्यावर नॉन कोविड उपचारादरम्यान 8 मार्चला सकाळी पावणे बारा वाजता मृत्यू झाला. ही माहिती डॉक्टरांनी मुलगा सलीम शेख यांच्या पासून लपवली आणि मृतदेहावर उपचार सुरू ठेवले. दोन दिवसांनी डॉ.वाठारकर यांनी नातेवाईकांना बोलावून रुग्ण मृत झाल्याची माहिती दिली. 


नगरपालिका नोंदणी विभागात मृत्यू वेळ 8 मार्चला सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी झाली असल्याची नोंद आहे. पण, डॉक्टरांनी 10 मार्चला मृत्यू झाल्याचं सांगत मृतदेह ताब्यात दिला. यामुळे नातेवाईकांना संशय आला. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. धक्कादायक म्हणजे, आरोपी डॉक्टर योगेश वाठारकरने सायरा शेख दोन दिवस जिवंत असल्याचे भासवून जादा बिलाची आकारणी केली. बनावट कागदपत्रं तयार करून 41 हजार 289 इतकं ज्यादा बिल नातेवाईकांच्या हाती दिलं. 


दोन दिवस मृतदेह हॉस्पिटलमध्ये ठेवून मृतदेहाची विटंबना करून विश्वासघात आणि फसवणूक केल्याबाबत बुधवारी रात्री उशिरा डॉ. योगेश वाठारकर याला पोलिसांनी अटक केली. यापूर्वी जिल्हाधिकारी यांचे आदेश असतानाही आधार हेल्थकेअर हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्ण दाखल करून घेतले नसल्यानं याच डॉकटरवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दरम्यान, आरोपी डॉक्टर योगेश वाठाराकर वर पोलिसांनी चुकीची कारवाई केल्याचा दावा आरोपीच्या वकिलांनी केला. दवाखान्यातील अन्य स्टाफ कडून मयताची दिनांक लिहण्यात चूक झाली होती. स्पेलिंग मिस्टक ही तांत्रिक बाब असल्याचं आरोपीचे वकील अॅड. प्रमोद सुतार यांनी म्हटलं आहे.