कोरोनामुळे कल्याणच्या डॉन बॉस्को शाळेचं कारागृहात रुपांतर
आधारवाडी जेलमध्ये कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैदयांची डॉन बोस्को शाळेत व्यवस्था
मुंबई : आधारवाडी जेलमध्ये कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैदयांची डॉन बोस्को शाळेत व्यवस्था करण्यात येणार आहे. जेल प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेलमधील कैद्यांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र शहरात घडणाऱ्या विविध गुन्ह्यातील गुन्हेगारांना नियमित कारागृहात पाठवले जात असून बाहेरून येणाऱ्या कैद्यामुळे कारागृहातील कैद्यांना करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैद्यांची व्यवस्था जेल बाहेरच करण्याचा निर्णय आधारवाडी जेल प्रशासनाने घेतला आहे.
नवीन कैद्यांना त्याच परिसरातील डॉन बॉस्को शाळेत व्यवस्था केली आहे. या शाळेला चोख पोलीस बंदोबस्त देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दाटीवाटीने भरलेल्या आधारवाडी कारागृहातील काही कैद्यांची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी अद्यापि 800 हुन अधिक कैदी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित राहण्यासाठी नियम पाळणे गरजेचे असून जेलमधील कैद्याची संख्या कमी केल्याशिवाय सुरक्षित रहाणे, नियम पाळणे शक्य नसल्यामुळे काही कैद्याची पॅरोलवर सुटका करण्यात आली असली तरी कारागृहातील कैद्याची संख्या फारशी कमी झालेली नाही.
नव्याने येणाऱ्या कैद्यामुळे कारागृहातील कैद्यांना करोनाची लागण होण्याची भीती असल्यामुळे या कैद्यांच्या सुरक्षेसाठी नव्या कैद्यांची व्यवस्था या शाळेत करण्यात आली आहे.