Maharashtra Politics : पुण्यातल्या भाजपच्या अधिवेशनात अमित शाहांनी शरद पवारांवर जहरी टीका केली. भारताच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके कोणी असतील तर ते शरद पवार आहेत असा घणाघात अमित शाहांनी केला. मात्र याच टीकेवरुन आता अजित पवारांचीच अडचण होत असल्याची दिसत आहे. अजित पवारांनी शरद पवारांवरच्या टीकेवर बोलणंच टाळलं.  तर दुसरीकडे अमित शाहांची टीका हास्यास्पद असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवार गटाच्या आमदाराने दिली भाजपला समज


अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेनंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवार गटाचे माजी आमदार विलास लांडेंनी तर पवारांवरच्या टीकेवरुन थेट भाजपला समज दिली. पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नये असं पत्र त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना पाठवलंय.


अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा, खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार


अमित शाहांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा, खासदार सुप्रिया सुळे यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपने आरोप केलेले डर्टी डझन आज त्यांच्याच सरकारमध्ये मंत्री असल्याकडे लक्ष वेधत, सुप्रिसा सुळे यांनी अमित शाहांच्या टीकेचा समाचार घेतला. त्याचवेळी आपल्याला याबाबत काही माहिती नसल्याचं सांगत, अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भटकती आत्माचा उल्लेख केला होता.. मोदींनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, तरीही ती टीका शरद पवारांवरच केल्याचा दावा करण्यात आला. लोकसभा निकालाआधी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर थेट शरद पवारांना संपवण्याची भाषा केली होती.. अजित पवारांनी यावरुन चंद्रकांत पाटलांची खरडपट्टी काढली होती.  चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या वक्तव्यामुळे मतं कमी पडल्याचंही अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं.. लोकसभा निकालात ठेच लागूनही भाजप नेते काही सुधारताना दिसत नाहीत.


आताही विधानसभा निवडणुकांआधी अमित शाहांनी शरद पवारांवर जहरी टीका केलीय.. शरद पवारांवरील टीकेमुळे विधानसभेतही भाजपला फटका बसू शकतो असा लेटर बॉम्ब अजित पवारांच्याच नेत्यांनी भाजपवर टाकलाय. आता भाजप नेते यानंतर तरी काही धडा घेतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र यात सर्वात मोठी कोंडी होतेय ती अजित पवारांची..