मुंबई : दूध केवळ सकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या वेळेतच मिळणार, भाज्या खरेदीची वेळ सकाळी ८ ते ११ अशी ठरवून दिली आहे, किराणा माल, औषधाची दुकानं सकाळी ८ ते ११ या वेळेतच खरेदी करता येईल. असे एक ना अनेक संदेश सोशल मीडियावरून फॉरवर्ड केले जात आहेत. लोक त्यावर विश्वास ठेवून ते आणखी पुढे पाठवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून गोंधळलेले लोक दूध, भाज्या, किराणा, औषधं खरेदी करण्यासाठी विनाकारण गर्दी करत आहेत. त्यामुळे अखेर पोलिसांना अशा अफवांची दखल घ्यावी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावरून व्हायरल होणाऱ्या अफवा पोलिसांपर्यंत पोहचल्यानंतर मुंबई पोलिसांनी आयुक्तांच्या आदेशावरून ट्वीट करून यावर खुलासा केला आहे. या केवळ अफवा असून त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असा संदेश मुंबई पोलिसांनी जनतेला दिला आहे. असे संभ्रम निर्माण करणारे मेसेज सोशल मीडियातून तुमच्यापर्यंत पोहचले तर कुणाला संपर्क साधायचा हेदेखिल पोलिसांनी कळवलं आहे.


सोशल मीडियावरील अफवा पसरवणाऱ्या मेसेजबद्दल मुंबई पोलीस म्हणतात, ‘’या अफवा कोरोना व्हायरसपेक्षा कमी संसर्गजन्य नाहीत. ही यादी तपशीलवार वाटत असली तरी ती खोटी आहे. अशा कोणत्याही सूचना मुंबई पोलीस आयुक्तांनी दिलेल्या नाहीत. जर कुणाला काही शंका असेल तर त्यांनी १०० नंबरवर फोन करावा किंवा पोलिसांना ट्वीट करावे.”



यापुढे कोणतीही शंका असेल तर १०० नंबरवर फोन करून पोलिसांकडून खात्री करून घेण्याची सूचना मुंबई पोलिसांनी केली आहे. याशिवाय कोणतीही शंका असेल तर मुंबई पोलिसांच्या @MumbaiPolice या ट्वीटर हँण्डलवर ट्वीट करून खात्री करून घ्या, असं पोलिसांनी सांगितलं आहे.


अमूक भागात कोरोनाचा रुग्ण आढळला, अमूक दुकानदार कोरोना बाधित आहे. त्याच्याकडून वस्तू खरेदी करू नका, अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियावरून गेले अनेक दिवस पसरवले जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली असून यापुढे असे मेसेज पाठवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहेच, पण नागरिकांनीही शंका असेल तर पोलिसांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.