योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : कोरोना व्हायरसची परिस्थिती आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शरद पवार नाशिकच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटात राजकारण करू नये, असं आवाहन केलं. 'महाराष्ट्राच्या जनतेचं आम्ही सगळे देणं लागतो. अशावेळी राजकीय मतभेद, मतभिन्ना न आणता जे काही करता येईल ते करावं. देवेंद्र फडणवीस यांनीही या कामात लक्ष घालावं, अशी आमची अपेक्षा आहे,' असं वक्तव्य शरद पवारांनी केलं. 


मुख्यमंत्री येणार होते, पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'देशाच्या तुलनेत मुंबई, कल्याण-डोंबिवली, नाशिक, कोल्हापूर, अकोला आणि औरंगाबादमध्ये संख्या वाढत आहे. मुंबईचं चित्र दुरूस्त होत आहे. या सगळ्या जिल्ह्यात पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री बैठका घेत आहोत. मुख्यमंत्री येणार होते, मात्र आम्ही या जिल्ह्यात जाऊन आढावा घेऊ आणि त्यांना याबाबत माहिती देऊ, म्हणजे पुढील निर्णय घेता येईल,' अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. 


इथून पुढे कोरोनाला घेऊनच जगावं लागेल आणि परिस्थितीला तोंड द्यावं लागेल, असं तज्ज्ञांनी सांगितल्याचंही शरद पवार म्हणाले. 


पवारांचा डॉक्टरांना इशारा 


नाशिक शहरात आरोग्य विद्यापीठ आहे. जे शहर डॉक्टर तयार करतं, त्या शहरात डॉक्टरांची कमतरता आहे. डॉक्टर्स उपचारासाठी पुढे येत नाहीत, हे दुर्दैव आहे. आपत्कालिन कायद्याचा वापर करून डॉक्टरांवर सक्ती करावी लागेल, असा इशाराही पवारांनी दिला. तसंच महागडी इंजक्शन उपलब्ध करुन देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्याचंही पवार म्हणाले.


लॉकडाऊनचं काय?


लॉकडाऊनबाबत तिथली स्थानिक परिस्थिती बघून, तिथल्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा. आरोग्यासोबतच आर्थिक संकटही आहे. नाशिक, पुणे, औरंगाबाद, नागपूर ही औद्योगिक शहरं आहेत. मुंबईही एकेकाळी होती, पण आता मुंबई उद्योगधंद्यात राहिली नाही. औद्योगिक शहरं सुरळीत सुरू राहवीत, याबाबत अधिक विचार करावा लागेल. 


कोरोना भीतीने इथला कामगार, उत्तर प्रदेश, झारखंड, राजस्थान या राज्यांमध्ये गेला. हे कामगार राज्यात परतण्यास उत्सुक आहेत. कारखानदारी पूर्ण क्षमतेने चालवून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं कसं पुनरुज्जीवन होईल, याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असा सल्ला पवारांनी दिला.