`मुंबई-पुण्याहून प्रवाशांना पाठवू नका`, या पालकमंत्र्यांची विनंती
कोरोना व्हायरसचं थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.
कोल्हापूर : कोरोना व्हायरसचं थैमान काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्रामध्ये भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आहे. एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे १७,६७१ रुग्ण झाले आहेत, तर ६५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत, तर पुण्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मुंबई-पुण्यात अडकलेले नागरिक त्यांच्या मूळ गावी परतत आहेत. पण पुढचे ४ दिवस मुंबई, पुणे आणि रेड झोनमधल्या नागरिकांना कोल्हापूरला पाठवू नका, अशी मागणी कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे. सतेज पाटील यांनी पोलीस महासंचालकांना ही विनंती केली आहे.
मुंबई-पुण्याहून ८६ हजार लोकं कोल्हापुरात दाखल झाले आहेत. यातले १२ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. कोल्हापूरकरांना याची काळजी घ्यावी लागणार आहे, असं सतेज पाटील म्हणाले. रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाचा स्वॅब घ्यायचा निर्णय आम्ही घेतला, या निर्णयाचा फायदा आम्हाला होत आहे, अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिली आहे.
रेड झोनमधून येणाऱ्या प्रत्येकाला आम्ही हायवेवरूनच हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहोत. हॉस्पिटलमध्ये त्यांचा स्वॅब घेतला जातो आणि त्यांना २४ तास क्वारंटाईन ठेवलं जात आहे. या व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच आम्ही त्यांना सोडत आहोत. याच पद्धतीमुळे आम्हाला १० ते १२ रुग्ण सापडल्याची माहिती पाटील यांनी दिली.