`इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाऐवजी संशोधक केंद्र उभारा`, कोणी केली ही मागणी?
मुंबईतल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होतंय. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम कासवगतीनं सुरु आहे
मुंबईतल्या इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक होतंय. गेल्या अनेक वर्षांपासून या स्मारकाचं काम कासवगतीनं सुरु आहे. या स्मारकाच्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या ग्रंथांवर संशोधन करणारं केंद्र उभारावं अशी मागणी करण्यात येतेय.
इंदू मिलमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडलं आहे. 2013 मध्ये इंदू मिलमधील स्मारकाची घोषणा झाली. 2020 ला स्मारकाच्या पायाभरणीला सुरुवात झाली. सध्या स्मारकाचं काम पन्नास टक्कांपेक्षाही जास्त झालं आहे. स्मारकाच्या उभारणीचा वेग फारच कमी असल्यानं आंबेडकरी अनुयायांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडं बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुजात आंबेडकर यांनी स्मारकापेक्षा बाबासाहेबांनी लिहिलेल्या ग्रंथावरील संशोधन केंद्र उभारण्याची मागणी केली आहे.
इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाच्या उभारणीत दरवेळी काहीतरी नवीन सुधारणा सांगितल्या जातात त्यामुळं स्मारकाला उशीर होत असल्याचा दावा माजी मंत्री छगन भुजबळांनी केला आहे.
बाबासाहेबांच्या स्मारक उभारणीत तांत्रिक उशीर झाला असेल पण निधीची कमतरता पडू देणार नाही अशी भूमिका माजी मंत्री उदय सामंतांनी घेतलीय.
बाबासाहेबांचं इंदू मिलमध्ये अतिभव्य स्मारक व्हावं अशी भावना सर्वांचीच आहे. पण त्या स्मारकात बाबासाहेबांनी लिहलेल्या ग्रंथांवर संशोधन केंद्र सुरु झाल्यास दुधावर साय पडेल अशी भावना आंबेडकरी जनतेत आहे.