मयूर निकम, झी मीडिया, बुलडाणा : सिझेरीयन करावं की नॉर्मल डिलीव्हरीच व्हावी? हा नेहमीचाच वाद... सध्या नॉर्मल डिलीव्हरीज तुलनेनं कमी झाल्यात... पण बुलडाण्यातल्या एका डॉक्टरचा नॉर्मल डिलीव्हरीच व्हावी, असा आग्रह आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिझेरीन झालं... आजकाल सर्रास ऐकू येणारं हे वाक्य... प्रसूती नॉर्मल असावी की सिझेरीन यावरुन बराच वादही सुरू असतो... १०० टक्क्यांपैकी जवळपास ९० टक्के प्रसूती सिझेरीयन होतात.... पण बुलडाण्यातले एक डॉक्टर याला अपवाद ठरलेत.... सिंदखेडराजा तालुक्यातल्या दुसरं बीडमध्ये डॉक्टर दशरथ शिंदे यांनी आतापर्यंत तब्बल २४ हजार नॉ़र्मल प्रसूती केल्या आहेत. १९८२ पासून ते प्रसूती करतात... अत्यंत गरीब घरात जन्माला आलेले डॉ. दशरथ शिंदे हे १९८० साली डॉक्टर झाले आणि सेवा गरीब जनतेसाठीच सेवा करायचं त्यांनी ठरवलं...  दुसरं बीडमध्ये त्यांनी प्रॅक्टिस सुरु केली. सगळ्यात पहिली प्रसूती त्यांनी अवघ्या ३ रुपयांत केली. प्रसूती नॉर्मलच झाली पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो.


कित्येक वेळेला अत्यंत गुंतागुंतीची असलेली प्रसूतीही त्यांनी नॉर्मल केली आहे.... बाळाच्या गळ्याभोवती नाळ गुंडाळलेली असल्यास, बाळानं पोटात शी केल्यास, बाळ पायाळू असल्यास , गर्भातलं पाणी कमी झाल्यास सिझेरीन करावं लागतं असं सांगितलं जातं. पण शिंदे यांनी बाळाच्या मानेभोवती नाळ गुंडाळलेली असताना किंवा बाळ पायाळू असतानाही नॉर्मल डिलीव्हरी केलीय.  तीन महिन्यांपूर्वी डॉ . शिंदे यांनी ४ किलो ८०० ग्रॅम वजनाचं बाळ असलेल्या आईचीही प्रसूती नॉर्मल केली होती. त्यात आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.


डॉ. शिंदे सामाजिक बांधीलकी जपत अत्यंत कमी शुल्कामध्ये प्रसूती करतात. विशेष म्हणजे एखाद्या महिलेला मुलगी झाली तर आणखी कमी शुल्क घेतलं जातं. सध्या सर्रास सिझेरीन करुन प्रसूती केल्या जातात... अशा वेळी नॉर्मल प्रसूतीसाठी आग्रह धरणारे डॉक्टर फारच कमी.... डॉ. दशरथ शिंदे म्हणूनच वेगळे ठरतात.