Honey Trapped Pune DRDO Scientist : हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकाने पाकिस्तानच्या हेरांशी परदेशात जाऊन भेट घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. ATSच्या चौकशीतून ही माहिती उघड झाली आहे. हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओ संचालकानं भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानी हेरांना दिल्याचा संशय आहे. संचालकाला स्मार्टफोन वापरण्यास बंदी होती. तरीदेखील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा वापर करुन गोपनीय माहिती पाकिस्तानी हेरांना दिली. या प्रकरणाची चौकशी सुरु असून, मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता न्यायालयाने 9 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


 पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवल्याचा संशय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या अधिकाऱ्याने अनेक क्षेपणास्त्रांसह DRDO च्या अनेक धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे. त्यामुळे याबाबतची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे.  त्याच्यावर ऑफिशियल सीक्रेट अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तानस्थित गुप्तचर यंत्रणांना माहिती दिल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून मोबाइल फोन आणि एक वैयक्तिक लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. डीआरडीओकडून या संदर्भात तक्रार करण्यात आली. त्यानंतर तपास सुरु करण्यात आला आहे. त्याला बुधवारी अटक करण्यात आली आणि गुरुवारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले , जेथे एटीएसने त्याची कोठडी सुनावली होती.  



पाकिस्तानस्थित गुप्तचरांच्या संपर्कात


हे प्रामुख्याने हनीट्रॅपचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांचे फोटो वापरुन अडकल्याचे पुढे आलेय. त्यानंतर तो पाकिस्तानस्थित गुप्तचरांच्या संपर्कात आला. तो गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत व्हॉईस संदेश आणि व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानस्थित ऑपरेटर्सच्या संपर्कात होता आणि त्याने काही संवेदनशील माहिती पाकिस्तान गुप्तहेरांना पुरवल्याची संशय होता, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली.  पाकिस्तानी एजंट म्हणून त्यांने काम केल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येणार आहे.


परदेश दौऱ्यांची होणार चौकशी


दरम्यान, महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्हा सत्र न्यायालयासमोरील रिमांड अर्जात मागणी केली आहे की, अटक केलेल्या डीआरडीओचे संचालकांच्या कथित संबंधांच्या चौकशीसाठी त्यांचे परदेश दौरे तपासायचे आहेत. एटीएसने पुढे म्हटले आहे की, प्रदीप कुरुलकर या व्यक्तीने 13 डिसेंबर 2022 ते 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत वैज्ञानिक 'एच' म्हणून काम केले आणि आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केला आणि त्याने इतर व्यक्तींना संवेदनशील माहिती दिली की नाही याचा तपास करणे आवश्यक आहे.