कार्टून स्टिकरच्या नावाखाली ड्रग्जची विक्री, तुमची मुलं या जाळ्यात अडकत नाहीयेत ना ?
एलएसडी किंवा पेपर बॉम्बवर स्मगलर्सची नजर
कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : कोकेन, चरस, अफिम, गांजा आदी प्रचलित अमली पदार्थांवर देशात बंदी आहे. त्यामुळे पोलीस आणि NCB सारख्या यंत्रणांची त्याच्या तस्करीवर बारीक नजर असते. त्यामुळे स्मगलर्स नवनवी शक्कल लढवत असतात. आता एलएसडी किंवा पेपर बॉम्ब याची भर पडलीये.
गंधहीन असलेलं हे ड्रग सहजासहजी ओळखता येत नाही. कार्टूनच्या स्टिकरवर ते चिकटवलेलं असतं. पेपरची चव घेतल्याशिवाय त्याचा शोध लागणं कठीण आहे.
यासाठी एक विशिष्ट प्रकारचा पारदर्शक कागद वापरला जातो. हा कागद अॅसिडमध्ये भिजवून त्याला डाईएथाइलामाईंड या केमिकलमध्ये ट्रान्स्परन्ट फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केलं जातं. त्यानंतर ही पेपरशिट सुकवली जाते. त्यावर कार्टूनचे स्टिकर्स लावले जातात. त्यानंतर त्यावर पिंक सुपरमॅन, ब्लू बॅटमॅन, ब्लॅक स्पायडरमॅन यांची चित्र चिकटवली जातात.
सध्या ड्रग्ज मार्केटमध्ये आय 25, प्रमोदम, टपरी अशा विविध नावांनी हे एलएसडी ओळखलं जातं. पेपरचा तुकडा जिभेवर ठेवताच तो हळूहळू विरघळू लागतो आणि नशा चढते. एका पेपर बॉम्बची किंमत 165 डॉलर्स म्हणजे अंदाजे 12 हजार रुपये आहे. कॉलेज, विद्यापीठांच्या परिसरात ड्रग्जचं जाळ पसरवण्यासाठी याचा वापर केला जातोय.
संवाद तुटल्यामुळे मुलं काय करतायत, याची पालकांना माहिती नसते. त्यामुळे मुलं अमली पदार्थांच्या आहारी जाण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यामुळे संवाद वाढवणं आणि सामाजिक जनजागृती महत्त्वाची असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
हे ड्रग भारतात विशेष करून मुंबई आणि उपनगरांमध्ये रुजवण्यासाठी ड्रग्ज माफिया मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच यंत्रणांइतकंच सामान्य नागरिकांनीही सावध राहणं आवश्यक आहे.