परतीच्या पावसाचा द्राक्ष बागांना फटका; द्राक्षांचे घड जमीनदोस्त
करोडो रूपयांच्या पिकांचं नुकसान
सटाणा : नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात परतीच्या पावसाचा द्राक्ष पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. सटाण्यात करोडो रूपयांच्या पिकांचं नुकसान झालं आहे. नाशिक सटाणा तालुक्यातील आर्ली द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला.
लांबलेला पावसाळा, धुके आणि ढगाळ हवामानामुळे द्राक्षांचे १८०० हेक्टर क्षेत्र बाधित झालं. पावसामुळे द्राक्षांचे घडच्या घड शेतात पडले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी खराब झालेल्या द्राक्षांचा खच घालून ठेवला आहे.
नवनर्वाचित आमदार दिलीप बोरसे यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना बरोबर घेत पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा पाहणी केली. तसेच संबधित विभागाला नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानगस्त भागात भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
दुसरीकडे, राज्यात सर्वाधिक प्रमाणात बागायती कापसाचे उत्पादन घेणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. अतिपावसामुळे बागायती कापूस काळवंडला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपये नुकसान झालं आहे. पावसामुळे बहुतेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेल्याने भाते पिके कुजली. तर काही ठिकाणी कापून ठेवलेली भातपिकं खराब झाली आहेत.