नदीपात्रात वाढ झाल्याने अजस्त्र मगरींचे दर्शन, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मगरी निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : सध्या चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. काही ठिकाणी पाणी पत्राबाहेर गेल्याने आश्रयासाठी मगरी या काठावर पाहुडल्या आहेत. आज हरिपूर येथे रेस्क्यू टीमला नदीच्या काठावर दोन अजस्त्र मगरी पहुडलेल्या निदर्शनास आल्या. तब्बल १२ ते १५ फूट लांबीच्या असणाऱ्या या मगरी निदर्शनास आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
दरम्यान कृष्णा काठी 'मगर' मिठी पडली आहे असं म्हणावे लागेल कारण मागील 15 वर्षात मगरीच्या हल्ल्यात 10 बळी आणि 12 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे वन खात्याने या मगरींचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. गेल्या काही वर्षात नदीपात्रात मगरीकडून होणारे हल्ले वाढले आहेत. अनेक ठिकाणी मगरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील अनेक गावे मगरींच्या भीतीच्या सावटाखाली आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या गावांतून होत आहे. त्यात हरिपूर येथील कृष्णा आणि वारणा नदीच्या संगमाच्या ठिकाणी दोन अजस्त्र मगरींचे दर्शन झाल्याने ग्रामस्थामध्ये मोठे भीतीचे वातावरण आहे.
आयर्विन पुलावरून नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केलेल्या तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टीमची तीन दिवसांपूर्वी शोध मोहम सुरु होती. यावेळी हरिपूर जवळ कृष्णेच्या काठी दोन १२ ते १५ फुटी मगर त्यांच्या निदर्शनास आली. या मगरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने काठावर पहुडलेल्या असल्याचं बोललं जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्रामस्थांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान मगरींचे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना केली आहे. कृष्णा आणि वारणा काठावरील मगरींचा अधिवास आणि जास्त वावर असलेली १७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये तुंग, मौजे डिग्रज, कसबे डिग्रज, सांगलीवाडी, सांगलीत माईघाट, हरिपूर, म्हैसाळ, मिरजेत कृष्णाघाट, ब्रह्मनाळ, चोपडेवाडी, सुखवाडी, अंकलखोप, धनगाव, आमणापूर, औदुंबर यांचा समावेश आहे.