23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नाही; ठाकरे गटाच्या भूमिकेमुळे जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी
जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडलीय. ठाकरे गटानं 23 जागांपेक्षा एक जागाही कमी घेणार नसल्याची भूमिका घेतलीय.
Maharashtra Politics : देशात इंडिया आघाडीत रुसवेफुसवे सुरु आहेत तर राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये जागावाटपावरुन तिढा निर्माण झाल्याची चर्चा आहे.. लोकसभेच्या 23 जागा लढवण्यावर ठाकरे गट ठाम आहे. विशेष म्हणजे जिथे ठाकरे गटाचे खासदार नाहीत त्या अकोला आणि ईशान्य मुंबईच्या जागेवरही ठाकरे गटाने दावा केलाय.
ठाकरे गटानं कोणत्या 23 जागांवर दावा केलाय
रामटेक
बुलढाणा
यवतमाळ-वाशिम d
हिंगोली
परभणी
जालना
संभाजीनगर
नाशिक
पालघर
कल्याण
ठाणे
मुंबई उत्तर पश्चिम
मुंबई दक्षिण
मुंबई ईशान्य
मुंबई दक्षिण मध्य
रायगड
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
मावळ
शिर्डी
धाराशिव
कोल्हापूर
हातकणंगले
अकोला
काँग्रेसला मात्र ठाकरे गटाचा हा दावा मान्य नाही. काँग्रेसनं ठाकरे गटाची ही मागणी अक्षरश: धुडकावून लावलीय. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपावरुन जुंपलेली असताना वंचित बहुजन आघाडीनं एक वेगळाच प्रस्ताव ठेवलाय. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गट आणि वंचित आघाडी या चारही पक्षात लोकसभेच्या 48 जागांचं समसमान वाटप करावं आणि प्रत्येकी 12 जागा लढवाव्या असा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीनं दिलाय.
उत्तरेतल्या राज्यातल्या निकालांमुळे भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदे गटाची साथही भाजपला आहे. दुसरीकडे मविआत मात्र जागावाटपावरुन धुसफूस आहे. भाजपला हरवण्यासाठी मतभेद विसरुन एक होण्याचं आवाहन मविआतला प्रत्येक पक्ष करताना दिसतो. जागावाटपात मात्र नमती भूमिका घेताना दिसत नाही. त्यामुळे जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सोडवण्याचं आव्हान मविआतील नेत्यांसमोर आहे.
मविआतलं जागावाटप मेरिटनुसारच होणार...मविआत जागावाटपावरुन कोणतीही धुसफूस नाही असं स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी दिलंय...जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र असून, ज्याचा भक्कम उमेदवार त्याला जागा मिळेल. यासोबतच मविआत येण्याबाबत वंचितशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती राऊतांनी दिली.
मकरसंक्रांतीच्या दिवशी राज्यभर महायुतीचे मेळावे होणार आहेत.
14 जानेवारीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होणार आहेत. प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केलीय. 14 जानेवारी रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे एकत्रित मेळावे होणार आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात महायुतीची जोरदार तयारी सुरू झालीय.