आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण :  कल्याण हे ऐतिहासिक शहर म्हूणन ओळखलं जातं. मात्र आता ही ओळख पुसू लागली आहे. डम्पिंग ग्राउंडमधल्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे रहिवाशी पुरते हैराण झाले आहेत. कल्याण हे कचऱ्याच्या दुर्गंधीचं आगार म्हणून ओळखलं जाऊ लागलंय. कल्याणमधल्या नागरिकांचं जीणं मुश्किल झालंय. डम्पिंग ग्राउंड त्याला कारणीभूत ठरलंय. रोजच्या दुर्गंधीमुळे नागरिक पुरते हैराण झाले आहेत. आम्ही सध्या मरण यातनातून जात आहोत असा संताप इथले रहिवासी व्यक्त करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केएडीमसीने कोर्टात एका वर्षात कचऱ्याची विल्हेवाट लावू असं सांगितलं होतं. त्यानंतर घनकचरा मुक्तीसाठी महापालिकेकडून पावलं उचलण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने हा प्रकल्प बंद पडला. त्यामुळे कचऱ्याची समस्या कशी सुटणार असा प्रश्न उपस्थित होतोय. 


महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ६०० मेट्रीक टन कचरा गोळा होता. वर्षानुवर्षे हा कचरा आधारवाडीत टाकला जात असल्याने इथे कचऱ्याचे मोठे डोंगर निर्माण झालेत.  
  
गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी नुकताच कल्याण डोंबिवलीचा दौरा केला होता. शहरातील रस्त्यांबरोबरच साफसफाईवर विशेष भर देण्यात यावा, असे निर्देश त्यांनी पालिका आयुक्तांना दिले. मात्र प्रकल्पाची कामं बंद असल्याने कचऱ्याचा प्रश्न कधी सुटेल, स्वच्छ आणि सुंदर कल्याण डोंबिवली कधी होईल याबाबत शंका उपस्थित केली जातेय. 


गेल्या काही महिन्यांपूर्वी, कल्याणला खाडीशेजारी गणेश घाट परिसरात असणाऱ्या कचऱ्याचा अवाढव्य डोंगर निर्माण झाला होता. कचऱ्याचा डोंगर होऊन त्याची उंची तब्बल ३५ मीटरपर्यंत पोहोचली होती. महापालिकेचं डम्पिंग ग्राऊंड शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचा दावा केला जातोय. मात्र, त्यावर कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही.


मनपा हद्दीतून रोज जवळपास ६४० मेट्रीक टन कचरा टाकला जातो. कल्याण शहरात भिवंडीकडून प्रवेश करताना स्वागत होतं ते याच कचऱ्याच्या दुर्गंधीने. पावसाळ्याचे ४ महिने वगळले तर कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडला सातत्याने आगही लागत असते. त्यामुळे अशा डम्पिंगला लागलेल्या आगीच्या धुरात, दुर्गंधीत कल्याणकरांचा श्वास घुसमटतोय.