जळगाव : पैसे दिल्यानंतर आरटीओ कार्यालयात कोणतीही कागदपत्रे तयार होतात असा प्रकार जळगाव आर.टी. ओ.कार्यालयात उघड झाला आहे. या कार्यालयातून चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाने २००४ मध्ये ट्रॅक्टरचा परवाना तयार झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर.टी.ओ.कार्यालयात दलालांमार्फत कशा प्रकारे कामं चालतात याचा लोकांना चांगलाच अनुभव आहे. पण आतातर चक्क मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांच्या नावानेच बनावट कागदपत्र तयार होऊ लागल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दलाल कशा प्रकारे नियमांची पायमल्ली करतात हे या निमित्ताने पाहायला मिळालं आहे. 


सुरुवातीच्या काळात आर.टी.ओ. कार्यालयामार्फत पुस्तक स्वरुपात वाहन चालविण्याच्या परवान्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र हा परवाना तयार करीत असताना नियमांची पायमल्ली होत आहे. तसाच काहीसा प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर वाहन परवाना क्रमांक २२३३/२००४ हा तयार करण्यात आला आहे. या परवान्यावर मुख्यमंत्र्यांची बनावट सही तयार केली आहे. त्यांच्या निवासाचा पत्ता बजरंगपुरा, जामनेर हा दाखविला आहे. त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत तर रक्तगट ए-पॉझिटीव्ह दर्शविलेला आहे.



धक्कादायक म्हणजे २००४ मध्ये काढलेला हा परवाना २०१८ मध्ये उघडकीस आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जळगाव आर.टी.ओ.ने २०२४ पर्यंत वाहन परवाना दिला आहे. त्यात दुचाकी, अवजड वाहन आणि ट्रॅक्टरचा परवाना दिला आहे. या परवान्याच्या बदल्यात १८० रुपयांचे चलान देखील फाडण्यात आलेले आहे.