तरुण मुलांना का व्हायचंय दादा, भाई, डॉन? तरुणांमध्ये वाढतेय `दुर्लभ गँग`ची क्रेझ
कोण आहे हा दुर्लभ कश्यप? आणि तरुण मुलं या गुंडाला एवढं फॉलो का करतायत?
विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : कपाळाला आडवा गंध, डोळ्यात काजळ, गळ्यात काळं उपरणं किंवा रुमाल. कुख्यात दुर्लभ कश्यप (Durlabh Kashyap) गँगच्या या खाणाखुणा. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत (Aurangabad) ही दुर्लभ गँग सक्रीय झाली आहे. पुंडलिक नगर, हनुमान नगर, भारत नगर भागात गँगनं घातलेल्या धुमाकुळामुळे लोकं हैराण झाले आहेत.
या गँगचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. 'पूजा भी करता हूं, जाप भी करता हूँ, कही देवता ना बन जाऊ, इसलिए पाप भी करता हुँ' असं गँगच्या प्रोफाईलमध्ये म्हटलं आहे. अलिकडेच या गँगनं MPSCची तयारी करणाऱ्या शुभम मनगटे या तरुणावर तलवारी, चाकू आणि फायटरनं प्राणघातक हल्ला केला होता.
मुळात ज्याच्या नावानं ही टोळी धुमाकूळ घालतेय, तो गुंड दुर्लभ कश्यप केव्हाचाच ढगात गेलाय आहे.
कोण आहे दुर्लभ कश्यप?
दुर्लभ कश्यप नावाचा हा गुंड मध्य प्रदेशातल्या उज्जैनचा असून 16 व्या वर्षीच तो गुन्हेगारी मार्गाला लागला. सोशल मीडियावरून तो कुणाचीही सुपारी घ्यायचा. शेकडो तरुण फेसबुकच्या माध्यमातून दुर्लभशी जोडले गेले. 6 सप्टेंबर 2020 रोजी गँगवॉरमध्ये तो ठार झाला. मात्र दुर्लभचा निर्घृण खून होऊनही अनेक तरुण गँगमध्ये सामील होत आहेत.
या गँगची औरंगाबादेत एवढी दहशत आहे की, त्यांच्याविरोधात बोलायची कुणाची हिंमत नाही. नशेच्या गोळीच्या आहारी गेल्यानं तरुण मुलांची गुंडागर्दी वाढत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
दुर्लभ कश्यपसारखे गुंड गँगवॉरमध्ये बळी जाऊनही तरुण पिढी सुधरायला तयार नाही. उलट दादा, भाई, डॉन होण्याची स्वप्नं त्यांना पडतायत. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी पोलीस आणि समाजानंही वेळीच ठोस पावलं उचलण्याची गरज आहे.