`लॉ` परीक्षेत डमी उमदेवार बसवण्याची नडली घाई, डीवायएसपी निघाले मुन्नाभाई
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ऑक्टोबर, नोव्हेंबर २०१९ मध्ये विधी अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली होती. जालन्यातील सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय हे परीक्षा केंद्र होते. या परीक्षा केंद्रातील एक मोठा घोळ समोर आला आहे.
नितेश महाजन, झी मीडिया, जालना : सावित्रीबाई फुले कला, वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर विधी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे विद्यार्थी आणि जालन्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर यांनी डमी विद्यार्थी बसवून पेपर दिल्याची तक्रार करण्यात आली होती.
ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या आदेशाने व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. या समितीने चौकशी केली असता या तक्रारीत तथ्य आढळून आले.
समितीने सादर केलेला अहवाल परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या ९ मे २०२२ रोजी बैठकीत स्वीकारण्यात आला. त्याआधारे परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा यांनी खिरडकर आणि डमी विद्यार्थी पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याबाबत एक पत्र कदीम पोलिसांना पाठविले आहे.
जालन्याचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांनी २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेला स्वतःच्या जागेवर पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक याला डमी विद्यार्थी बसवून परीक्षा दिली होती.
समितीने या दोघांना दोषी ठरवले आहे. त्यामुळे सुधीर खिरडकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मंडलिक यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे पत्र परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने कदीम जालना पोलिसांना दिले आहेत.
सुधीर खिरडकर हे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना वादग्रस्त ठरले होते. एका अँट्रोसिटीच्या प्रकरणातून आरोपीचे नाव वगळण्यासाठी त्यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने लाच घेतली होती. ही लाच स्वीकारताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली होती.
त्यानंतर त्यांची लातूर जिल्ह्यात बदली करण्यात आली. आता थेट तत्कालीन डिवायएसपी यांनीच 'लॉ'ची परीक्षा डमी विद्यार्थ्यांला बसवून दिल्याचे समोर आल्याने या 'मुन्नाभाई'ची जालन्यात एकच चर्चा रंगली आहे.