चंद्रशेखर भुयार, बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधल्या एका तरुणाने इलेक्ट्रिक फूड ट्रकची निर्मिती केली आहे. महाराष्ट्रातला अशा प्रकारचा हा पहिलाच चारचाकी फूड ट्रक आहे. दिसायला आकर्षक आणि १९८० सालच्या जुन्या व्हिंटेज कारसारखा दिसणारा हा आहे 'ई फूड टेम्पो'. बदलापूरमधल्या निखील राणे या तरुण उद्योजकाने या ई फूड टेम्पोची निर्मिती केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३०० किलो वजनाचा हा ई फूड टेम्पो १ हजार किलो भार वाहू शकतो. अवघ्या तीन महिन्यांत निखिल ने हा ई फूड टेम्पो तयार केला आहे. एक चालतंफिरतं अख्खं स्वयंपाकघरच यात सामावलेलं आहे. यामध्ये स्टेनलेस स्टिलचं किचन प्लॅटफॉर्म असून, त्यावर गॅस शेगडी बसवलेली आहे. तसेच खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी डिस्प्ले स्पॉटही देण्यात आले आहेत. 



या ई फूड टेम्पोमध्ये लाईटचीही व्यवस्था असून, खाद्यपदार्थ तयार करताना होणार धूर बाहेर जाण्यासाठी एक्झॉस्ट फॅन लावण्यात आला आहे. तसंच हात धुण्यासाठी एक वॉश बेसिन असून, पाणी साठवण्यासाठी पाण्याची टाकी सुद्धा यातच बसवण्यात आली आहे. 


या पूर्ण टेम्पोची बांधणी अॅल्युमिनियममध्ये करण्यात आली असून, ही ट्रॉली तीनही बाजुंनी उघडते. या ई फूड टेम्पोला बाराशे वॅटची इलेक्ट्रिक मोटार लावण्यात आली असून, १०० एम्पियरच्या ४ बॅटऱ्यांवरवर ताशी २० किलोमीटर वेगाने हा टेम्पो धावतो. तर एकदा बॅटरी चार्ज झाली की तो ५० ते ८० किलोमीटर अंतर कापू शकतो. त्यामुळे अवघ्या १०० रुपयांत हा टेम्पो ३०० ते ४०० किलोमीटर चालतो. हा ई फूड टेम्पो तयार करण्यासाठी ३ लाख रुपये इतका खर्च आला आहे. 


देशात तीन चाकी फूड टेम्पो पाहायला मिळतात. मात्र मेकॅनिकल डिप्लोमा असलेल्या निखिल राणेनं पहिल्यांदाच चार चाकी 'ई फूड टेम्पो'ची निर्मिती केली आहे. या पुढे अजून वेगवगळ्या ई वाहनांची निर्मिती करण्याचं निखिल राणेचं स्वप्न आहे.