पालघर : पालघरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत. सतत होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पुन्हा डहाणू तलासरी भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. २ वाजून ६ मिनिटांनी सर्वात मोठा भूकंपाचा हादरा बसला. ४.१ रिस्टर स्केल इतक्या तिव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. त्यानंतर ३ वाजून ३५ मिनिटांनी ३.३, संध्याकाळी ४ वाजून ५७ मिनिटांनी पुन्हा ३.५ रिश्टर स्केल भूकंपाचा हादरा बसल्याची माहिती असल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपात एका दोन वर्ष चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी पालघर जिल्हा सलग चार धक्क्यांनी हादरला. पालघरमधील तलासरी, डहाणू भागात शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर प्रशासनाला जाग आली असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. डहाणू आणि तलासरीत एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. पोलीस पथक, रुग्णवाहिका आणि इतर सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या पथकासह दीडशे तंबूचे सामान आणण्यात आले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी ४२ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.


सतत होणाऱ्या भूकंपाची प्रशासनाने अखेर दखल घेतली असून परिसरात भूकंपमापक यंत्रणा बसवण्यात आली आहे. भूकंपाच्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी भूकंपग्रस्तांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. भूकंपाच्या भीतीने काही ग्रामस्थ घर सोडून निघून गेले आहेत तर भूकंप कधीही होईल या भीतीने अनेकांनी घराबाहेर मंडपात संसार मांडला आहे. त्यामुळे नागरिकांना रात्र थंडीत कुडकुडत काढावी लागत आहे.