Hasan Mushrif ED Raid: राष्ट्रवादीचे आमदार आणि नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरी ईडीने धाड (ED Raid) टाकली. पहाटेपासून ईडीचं हे धाडसत्र सुरु आहे. (Maharashtra Political News) कागलमधल्या घरी ईडीचे अधिकारी दाखल झाले असून छापेमारी सुरु आहे. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. (Maharashtra News in Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Hasan Mushrif : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरांवर ED ची धाड


दरम्यान, राजकीय विरोधक आहेत म्हणून कोणी अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर सहन करणार नाही असा इशारा काल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला होता. खोट्य़ा केस टाकून त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास सहन करणार नाही असे ते म्हणाले होते. त्यानंतर आज  ED कडून राष्ट्रवादीच्या नेत्यावर कारवाई करण्यात आली आहे. 


कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप


मुश्रीफांच्या कोल्हापूर, पुणे घरावर ईडीची छापे टाकण्यात आलेत. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी याआधीच घोटाळ्याचे आरोप करत मुश्रीफ यांच्या ईडी चौकशीची मागणी केली होती. मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप सोमय्यांनी केला होता. त्यानंतर कागलच्या सर सेनापती साखर कारखान्यातही घोटाळ्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे कागदपत्र दिली होती. अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप होता.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांचे पुण्यातले पार्टनर  चंद्रकांत गायकवाड यांच्या ऑफिसवरही ईडीने छापे मारलेत. ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसवर हे छापे टाकले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना हा ब्रिक्स इंडिया कंपनीने उभारला. तसंच अप्पासाहेब नलावडे कारखानाही हीच कंपनी चालवत होती. कोलकात्याच्या कंपन्यांमधून पैसे मुश्रीफांच्या कारखान्यात आणण्यात गायकवाड यांचा हात असल्याचा आरोप आहे.


काय म्हणाले हसन मुश्रीफ?


आज सकाळपासून घरावर, नातेवाईक आणि मुलीच्या घरांवर छापे घातल्याचे समजत आहे. मी काही कामानिमित्ताने बाहेर आहे. मला दूरध्वनीवरुन ही बातमी मिळालेली आहे. कारखाना, घर आणि नातेवाईकांची घरे यांच्यावर छापेमारी करण्यात आली आहे. मी कार्यकर्त्यांना आवाहन करत आहे की, त्यांनी कागल बंदची घोषणा केली आहे. ती त्यांनी मागे घ्याव. त्यांनी शांतता ठेवावी.  ईडीच्या अधिकाऱ्यांना त्यांची कारवाई करण्यास सहकार्य करावे. या आधीही ईडीच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. केंद्रीय यंत्रणानी माहिती घेतली होती. मात्र, आता पुन्हा त्यांनी ही छापेमारी का केली हे मला काहीही माहिती नाही. 30 ते 35 वर्षांचे माझे सार्वजनिक जीवन लोकांच्या समोर आहे. दीड-दोन वर्षांपूर्वी कारवाई केल्यानंतर काहीही सापडलेले नाही. 


भाजप नेत्याचा या मागे हात, मुश्रीफ यांचा आरोप



चार दिवसांपूर्वी भाजपचे कागलमधील एक नेते दिल्लीत अनेकवेळा चकरा मारुन माझ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले होते की, चारच दिवसात मुश्रीफ यांच्यावर ईडीची कारवाई होईल, असे सांगितले होते. हे मी जबाबदारीने सांगत आहे. त्यानंतर ही कारवाई होताना दिसत आहे. एखाद्याला नाउमेद करण्याचे हे काम सुरु आहे. हे गलिच्छ राजकारण आहे. राजकारणात अशा कारवाया होणार असतील तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.



आधी नवाब मलिक झालेत. आता माझ्यावर कारवाई करण्यात येत आहे. अस्लम शेख यांच्यावरही कारवाई होईल, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणत आहेत. त्यामुळे विशिष्ट जातीच्या लोकांच्या लोकांना टार्गेट करण्यात येत आहे, अशी शंका निर्माण होत आहे, असे मुश्रीफ म्हणाले.