मुंबई : शिक्षकांसाठी (Teachers) एक चांगली बातमी आहे. राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शिक्षकांना रेल्वेप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आता शिक्षकांना लोकलमधून प्रवास करता येणार आहे. याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांबरोबर मुंबई लोकलमधून (Mumbai Local Train ) शिक्षकांना प्रवासाची मुभा मिळणार आहे.  दोन दिवसांपूर्वी शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याचे संकेत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होते.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळावी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली होती. यावेळी आमदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारतीच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी रेल्वे अधिकारी यांच्याशी बोलून तोडगा निघेल, असेही आश्वासन दिले होते. 


इयत्ता दहावीच्या मूल्यमापनाशी संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविला होता. या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे शिक्षकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येणार आहे.


इयत्ता दहावीचा  निकाल वेळेत घोषित करण्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. मूल्यांकन करून विद्यार्थिनिहाय माहिती राज्य मंडळाकडे पाठवणे, श्रेणी तक्ता तयार करणे, इत्यादी कामे करण्यासाठी शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांना रेल्वेप्रवासाची परवानगी देण्याबाबतचा पाठविलेला प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवला होता. 



शालेय शिक्षण विभागाच्या प्रस्तावाचे गांभीर्य व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दहावी मूल्यमापनाशी संबंधित शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेप्रवासाची मुभा दिली. या निर्णयामुळे दहावी निकाल वेळेत लागण्यास मदत होईल, तसेच पुढील शिक्षणासाठी विविध शाखांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा यामुळे  फायदा होईल.