शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच फी घ्यावी- बच्चू कडू
सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत.
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षणसंस्थांनी विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच शुल्क आकारावे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली. गेल्या काही दिवसांमध्ये शाळांकडून पालकांना फी भरण्यासाठी सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. या तक्रारींची दखल घेताना बच्चू कडू यांनी म्हटले की, ज्या संस्था या पालकांच्या भरवश्यावर मोठ्या झाल्या अशा संस्था फक्त एक वर्ष अर्धी फी घेऊ शकत नाही का? जर तुम्ही सक्ती केली तर गाठ आमच्याशी आहे हे शिक्षण संस्थांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.
बच्चू कडू यांनी थोपटली केंद्र सरकारची पाठ, म्हणाले...
सध्या कोरोना महामारीमुळे अनेक पालक आर्थिक संकटात आहेत. अशा वेळी त्यांच्यासोबत शिक्षण संस्थांनी उभे राहावे असे आवाहनही बच्चू कडू यांनी केले. जर शिक्षणसंस्थांनी ऐकले नाहीतर सरकार म्हणून आम्हाला कारवाई करावी लागेल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
शेतकऱ्यांवर दर दोन तीन महिन्यांनी संकट येत असतात. पण शिक्षण संस्थांवर आतापर्यंत कुठलेच संकट आलेले नाही. आतापर्यंत शिक्षणसंस्था या फायद्यातच होत्या. एखाद्या संस्थने सांगावे की आमची संस्था तोट्यात आहे. गेल्या २० वर्षांपासून या संस्थांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फी वर आम्ही कधी बोललो नाही. पण आता हे संकट मोठ त्यामुळे किमान यावर्षी विद्यार्थ्यांकडून शिक्षण संस्थांनी ५० टक्केच फी आकारावी, असे बच्चू कडू यांनी सांगितले.