अंड्यांचा ट्रक पळवला, चोर 1 लाख अंड्यांचं ऑम्लेट करुन खाणार?
चोरांनी अंड्यांचा ट्रक पळवला
अंबरनाथ : आतापर्यंत चोरीच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील पण चोरांनी अंड्यांचा ट्रक पळवल्याची बातमी कधी तुम्ही ऐकली नसेल. अंड्याने भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवून नेण्याची घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. ट्रकमध्ये तब्बल ५ लाख रूपयांची अंडी होती. कर्नाटकच्या बिदरमधून अंडी घेऊन ट्रक अंबरनाथमध्ये येत होता.
शनिवारी मध्यरात्री सव्वातीनच्या सुमारास हा ट्रक अंबरनाथच्या टी सर्कलजवळ येताच एक कार मागून येऊन या ट्रकच्या पुढे थांबली. या कारमधून उतरलेल्या चौघांनी ट्रकचालक मोहम्मद शेख आणि त्यांचा मुलगा मुजम्मिल यांना मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये बसवलं आणि डोळ्यांना पट्टी बांधून टिटवाळा येथील रायता गावाजवळ जंगलात नेऊन सोडलं.
चोरट्यांनी ट्रकचालक आणि त्यांचा मुलगा यांचा मोबाईल आणि पैसेही काढून घेतले. तर इतर साथीदारांनी अंड्यांनी भरलेला ट्रक पळवला.