जळगाव : जिल्ह्यात झालेला भाजपचा पक्ष विस्तार हा नाथाभाऊंमुळे झाला आहे. कोणा, बांडगुळांमुळे नव्हे!, अशा तीव्र शब्दांत एकनाथ खडसे यांनी जळगावातील पक्षांतर्गत विरोधकांवर निशाणा साधला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वेळी एकनाथ खडसे यांनी कोणाचाही नामोल्लेख करणे टाळले. मात्र, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे एकनाथ खडसे यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी म्हणून जिल्हाभर ओळखले जातात. त्यामुळे खडसे यांनी लागावलेला हा टोला महाजन यांनाच उद्देशून असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून खडसे समर्थकांनी जिल्हाभर शक्तिप्रदर्शन केले. या वेळी एकनाथ खडसे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या मुक्ताईनगरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी बोलताना खडसे यांनी आपल्या मनातील नाराजी पुन्हा एकदा व्यक्त केली.


कार्यक्रमादरम्यान बोलताना खडसे म्हणाले, आजवर भाजपची ओळख आणि स्थिती ही केवळ वाण्या-बामणांचा आणि धनदांडग्यांचा पक्ष अशी होती. मात्र, मुंडे, महाजन यांच्या काळात बहुजनांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. केवळ संधी मिळाली म्हणूनच नव्हे तर, पक्षवाढीसाठी मीही मनापासून प्रयत्न केले. जीवापाड मेहनत घेतली. त्यामुळे पक्षही वाढला. गेली ४० वर्षे राजकारणात आहे. पण, आजवरच्या राजकीय आयुष्यात एकही आरोप झालेला झाला नाही. मात्र, अलीकडे माझ्यावर खोटे आरोप झाले. मला बुडविण्याचा व बदनाम करण्याचा हा प्रयत्न होता. माझी चौकशीही झाली, मात्र आरोपांमध्ये कुठलेही तथ्य आढळले नाही. असे सांगतानाच, सुभाष देसाई यांच्या ३० हजार एकर जमिनीच्या घोटाळाप्रकरणी कोणीही बोलत नाही. देसाईंची आंतरराष्ट्रीय न्यायधीशांमार्फत चौकशी करणार काय, असेही खडसे या वेळी म्हणाले.