खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर, अजितदादाही राहणार उपस्थित
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे आज जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत.
जळगाव : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे हे आज जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत एकत्र व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार असल्यानं राज्यातील भाजप नेत्यांचेही या कार्यक्रमाकडे लक्ष लागलय.
पारोळा एरंडोलचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या वयाच्या साठीत पदार्णपणानिमित्त गौरव सोहळा पार पडतोय. जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक आमदारांची या कार्यक्रमाला असणारी उपस्थितीही आश्चर्यजनक राहणार आहेत.
दरम्यान, खडसे हे राज्याचे नेते असल्यानं त्यांच्यासारखा वजनदार नेता राष्ट्रवादीत आला तर त्यांचं स्वागतच असल्याचं मत राष्ट्रवादीने व्यक्त केलंय.
एकनाथ खडसेंना काँग्रेसचीही ऑफर
नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी एकनाथ खडसेंना काँग्रेसमध्ये यायची ऑफर दिली होती. यशोमती ठाकूर यांच्या या ऑफरला उत्तर देताना खडसेंचा आवाज काहीसा बदलला आणि येऊ शकतो असे सांगत या पक्षासाठी ४० वर्षं काम केलं, पण परिस्थिती काय घडवेल सांगता येत नाही, असं उत्तर देऊन खडसेंनी विधानसभेत एकच खळबळ उडवून दिली होती. हे कसले सरकार असा सवालही त्यांनी आपल्याच भाजपा सरकारला विचारला.
परिस्थिती माणसावर कोणतीही वेळ आणू शकते असे सांगत विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत खडसे यांची पक्षातील घुसमट पुन्हा एकदा समोर आली होती. राज्यात आणखी कृषी महाविद्यालये सुरू होण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना आपण आपल्या गावात १०० एकर जागा कृषी महाविद्यालयासाठी मोफत दिली. मात्र अद्याप महाविद्यालय सुरू झाले नाही.
यावेळी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी, "असा दिलदार माणूस आमच्या पक्षात येईल का" असे म्हणताच खडसे यांना भावना अनावर झाल्या. येऊ शकतो असे सांगतानाच परिस्थिती काय घडवेल सांगता येत नाही. ४० वर्षे पक्ष उभा केला, सरकार आणलं, आता हा पक्ष कसा सोडू शकतो, असे म्हणत त्यांनी स्वतःला सावरले.