दीपक भातुसे, झी मीडिया, नागपूर : विरोधी पक्षात असताना सातत्याने आपण मागण्या करायचो... मात्र आता सत्तेत आल्यानंतर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणीही केली जात नाही, असा घरचा आहेर भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला दिलाय.


सरकारला विचारला जाब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ खडसे यांनी आपल्याच सरकारला आज विधानसभेत चांगलंच अडचणीत आणलं. राज्य सरकारच्या रोजगार हमी योजनेतील कामांवर मोठ्या प्रमाणात बेरोजगार लोक काम करतात. त्यांना किमान वेतनही दिलं जातं. त्या कामगारांना कामगार कायद्यानुसार असंघटीत क्षेत्रातील कामगार म्हणून मान्यता आणि समावेश करणार का? असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज विधानससभेत राज्य सरकारला विचारला.


पंकजा मुंडे यांचा उत्तर देण्याचा प्रयत्न


खडसे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, हा प्रश्न मनरेगाशी संबधित असून केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. त्यावर आपण निर्णय घेवू शकत नाही. पंकजा मुंडे यांच्या या उत्तराने खडसेंनी पंकजा मुंडे यांनाच झापलं.


पंकजा मुंडेंना झापलं


पंकजा मुंडे यांच्या उत्तराला हरकत घेत 'मी प्रश्न विचारलाय तो महाराष्ट्र सरकारच्या रोजगार हमी योजनेबाबत आणि ही योजना राज्य सरकार चालवित असल्याची' आठवण करून दिली. त्यावर मंत्री पंकजा मुंडे यांनी सदर विषयाची माहिती घेऊन सदर माहिती सभागृहाला दिली जाईल, असं आश्वासन देत विषय संपवण्याचा प्रयत्न केला.


...खडसेंच्या जुन्या आठवणी!


यापूर्वीच्या सरकारने रोजगार हमी योजनेवरील कामगारांना असंघटीत कामगारांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून मी तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणून सातत्याने प्रश्न उपस्थित करत होतो. पूर्वी विरोधात होतो... त्यामुळे सातत्याने प्रश्न विचारायचो आता सत्तेत आलोय तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायची जबाबदारी असल्याची आठवण खडसे यांनी राज्य सरकारला करून दिली.


तसेच एकीकडे मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे नेते आणि आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळातील चुका दाखवत असताना खडसे यांनी जुन्या सरकारने चांगला निर्णय घेतला असल्याचे सांगत फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला.