मुंबई : ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने रिक्त झालेल्या जागांवरील पोटनिवडणुका अखेर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. कोरोनाची दुसरी अद्याप पूर्णपण ओसरलेली नाही, त्यातच कोरोनाची तिसरी आणि डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता राज्य सरकारनेही निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानुसार राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली. त्यामुळे या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील आजपासून शिथिल करण्यात आली आहे. 


धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदांमधील 70 निवडणूक विभाग आणि 33 पंचायत समित्यांमधील 130 निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी 19 जुलै 2021 रोजी मतदान होणार होतं. पण या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असं मदान यांनी सांगितल आहे.