एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर
पुण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पुणे : पुण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नक्षली कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. ज्यामध्ये पोलीस कारवाईत मारला गेलेल्या नवीन बाबू या नक्षलवादी नेत्याच्या स्मरणार्थ व्याख्यान ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती गुरुवारच्या सुनावणी दरम्यान समोर आली.
पुण्यातील एल्गार परिषदेसंदर्भात दाखल गुन्ह्यामध्ये सुधीर ढवळे, रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन आणि महेश राऊत यांना ७ जूनला अटक करण्यात आली होती. त्यातील ४ आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. त्यांना पुणे सत्र न्यायालयानं २१ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आजारी असल्यानं ससून रुग्णालयात दाखल असलेला आरोपी सुरेन्द्र गडलिंग याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. या प्रकारणातील सर्व आरोपी हे देशविघातक म्हणजे नक्षली कारवायांमध्ये सक्रीय आहेत. जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांनी अशा कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम ते करत. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवून मिळावी अशी विनंती सरकारी पक्षानं केली होती.
आरोपींच्या वकीलांनी त्याला विरोध दर्शवत आरोपींचा या गुन्ह्यांशी संबंध नसल्याचा युक्तीवाद केला. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयानं आरोपींची पोलीस कोठडी आणखी एक आठवड्यानं वाढवलीय.