रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्य़ातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी  स्थलांतरण करण्यात आले आहे. रत्नागिरीत 3896 तर सिंधुदुर्गात 144 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रायगड जिल्ह्यातील जवळपास 6 हजार नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यात आले आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यात आलं आहे. रायगडमध्ये उपाय योजनांची माहिती देण्यासाठी एसएमएस ब्लास्टर सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे.


अरबी समुद्रातील घोंगावत असलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे सागरी किनाऱ्यांवर असलेल्या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने खबरदाराची उपाय म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत. आज देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राज्यात केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.


कोरोना रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये तसेच ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील यादृष्टीने अगोदरच तयारी करून ठेवली असून प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना दिली.