रोज नवीन एक पेनड्राईव्हचं बाळंतपण होतंय, त्यांचा `पेनड्राईव्ह` तर आमचा `कव्हर ड्राईव्ह`
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. मग, महाराष्ट्रात वेगळेच राजकारण सुरु आहे.
मुंबई : महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाशी केंद्रीय तपास यंत्रणांनी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रातील सरकार चालू द्यायचे नाही हे त्यातून दिसून येत आहे. खोट्या प्रकरणातून हे सरकार त्यांना उध्वस्त करायचं आहे. परस्पर आरोप पत्र तयार करतात. आमच्यावर कोणते आरोप आहे हे आम्हालाच माहीत नाही, अशी टीका शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी केलीय.
ज्यांना ज्यांना तुरुंगात टाकायचे आहे त्याची यादी तयार करा आणि सांगा मला या 25 लोकांना तुरुंगात टाकायचे आहे. आधी तुरुंगात टाका मग आमच्यावर आरोप करा काही हरकत नाही. महाराष्ट्र हातातून गेल्यामुळे जो तुमचा आत्मा भडकला आहे तो शांत करा. महाराष्ट्रात कुपद्धतीच्या, घाणेरड्या पद्धतीच्या कारवाया सुरु आहेत. इतक्या हलकट आणि नीच पातळीचे राजकारण कधीही झाले नाही, असे ते म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांच्या शत्रूशी सन्मानाने वागायचा सल्ला दिला होता. मग, महाराष्ट्रात वेगळेच राजकारण सुरु आहे. आम्ही काय पाकिस्तानातून आलो आहे का? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात रोज एका नवीन पेनड्राईव्हचं बाळंतपण होत आहे. रोज एक खोट प्रकरण कसे तयार करता? रोज नवीन बाळंतपण कसं जमतं यांना? हे माहित नाही. त्यांच्या घरात रोज पेन ड्राइव बाळंत होतात का ते बघावे लागेल. 'हा पेन ड्राईव्ह, तो पेनड्राईव्ह, पण आम्ही एकच कव्हर ड्राईव्ह मारू', असा टोलाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.