Maharashtra News Today: 2019 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणूक त्यानंतरचं राजकीय नाट्य ते सध्या सत्तेत असलेला एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीचं सरकापर्यंत अनेक घडामोडींनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं. आता 2024 च्या निवडणुकांचा चर्चा सुरु असतानाच राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीसोबत पॅचअपसंदर्भातील उल्लेख करत एक मोठं विधान केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपासोबतच्या पॅचअपबद्दल आपल्या भाषणात उल्लेख केला.


भाजपाबद्दल काय म्हणाले उद्धव ठाकरे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी भाजपासोबत पॅचअप करु शकलो असतो पण माझ्या नितीमत्तेमध्ये ते बसत नव्हतं, असं उद्धव ठाकरेंनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या भाषणात म्हटलं. 'मी भाजपाशी पॅचअप करु शकलो असतो पण माझ्या नितीमत्तेत ते बसत नव्हतं. 2014 पासून ज्यांनी आपल्याला फसवलं त्यांच्याबरोबर कसं जाणार? मी मुख्यमंत्री होतो. माझ्या आमदारांना मला डांबून ठेवता आलं असतं. पण मनाने फुटलेत त्यांना डांबून काय कराणार? मी त्यांना काय कमी केलेलं?' असे प्रश्न उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांसमोरच्या भाषणात उपस्थित केले. 'मला स्वाभिमान महत्त्वाचा होता. शिवसेनेचे दरारा कायम राखणं महत्त्वाचं होतं. म्हणूनच मी तडजोड केली नाही,' असंही उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.


विदर्भाचा आढावा


उद्धव ठाकरेंकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून ते आजपासून विदर्भाचा आढावा घेणार आहेत. विदर्भमधील पक्षाची स्थिती कशी आहे, नेमकं काय काय काम येथील मतदारसंघामध्ये करावं लागेल याचा आढावा आजपासून उद्धव ठाकरे घेणार आहेत. विदर्भामधील 3 मतदारसंघाचा उद्धव ठाकरे प्रामुख्याने आढावा घेणार असून यामध्ये वर्धा, यवतमाळ-वाशिम, रामटेक मतदारसंघाचा समावेश आहे.


सत्तासंघर्षात मागील 4 वर्षांत काय काय घडलं?


2019 मध्ये भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र निवडणूक लढवल्यानंतर मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ अर्धा अर्धावेळ वाटून घेण्यावरुन वाद निर्माण झाला. यामधूनच दोन्ही पक्षांनी फारकत घेतली. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसबरोबर जुळवाजुळव करुन महाविकास आघाडी सरकारची मोट बांधली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पुढाकाराने महाविकास आघाडी सरकार 2019 साली नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सत्तेत आलं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र 2022 साली जून महिन्यामध्ये विधानपरिषदेच्या निवडणुकींनंतर शिवसेनेमध्ये फूट पडली. तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील मोठा गटाने सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने अल्पमतात गेलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत सत्ता स्थापन केली आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर मे 2023 मध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील गट फुटून बाहेर पडला आणि शिंदे सरकारमध्ये सहभागी झाला.