कोल्हापूर : कोरोनाच्या संकटामध्ये परीक्षा घेणं शक्य नसल्याचं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारला परीक्षा घ्यायच्या नाहीत, हा समज चुकीचा आहे. अचानक कोरोनाचं संकट दूर होणार आहे का? युजीसीने सगळ्या विद्यापीठांचा आढावा घ्यावा. रेड झोनमधील विद्यार्थी येऊन परीक्षा कशी देऊ शकतात, ते युजीसीने सांगावे, असं उदय सामंत म्हणाले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. राज्यातल्या सगळ्या कुलगुरूंशी चर्चा करुन सरकारने निर्णय घेतला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं हे काम काय रोबोट करु शकणार नाहीत. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणं शक्य नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली. 


मी ६० जीआर काढून ते मागे घेतले नाहीत, तर एकच जीआर काढला आणि त्याच्या मागे लागलो, असं म्हणत उदय सामंत यांनी विनोद तावडेंनाही प्रत्युत्तर दिलं. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्यामुळे याचं कुणीही राजकारण करू नये. मुलांच्या परीक्षांबाबत पालकांनी चिंता करू नये, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं. 


सीमा भागात मराठी महाविद्यालय


सीमा भागामधील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरु करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरू करणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या अंतर्गत हे महाविद्यालय सुरू करण्यात येईल, अशी घोषणाही उदय सामंत यांनी केली.