`भाजपच्या लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे`; बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळावरुन संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
Sanjay Raut : संजय राऊत यांच्या विधानानंतर सर्वज्ञानी राऊतांचं अगाध ज्ञान अशा शब्दात भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी राऊतांवर निशाणा साधलाय.
Maharashtra Politics : राज्यात गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्यांचा मालिकाच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रसाद लाड यांनी (Prasad Lad) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाल्याचे विधान केले होते. त्यावरुन प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (dr babasaheb ambedkar) यांचा जन्म महाराष्ट्रात झाला असे विधान केले आणि नवा वाद सुरु झालाय. भाजपने संजय राऊत यांना घेरलंय. यानंतर आता संजय राऊत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
महापुरुषांचा अपमान करतायत आणि आम्हाला अक्कल शिकवताय - संजय राऊत
"यात अपमान काय आहे? भाजपच्या काही लोकांचे मेंदू किड्या मुंग्यांचे आहेत असं मला वाटतंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे सुपूत्र नाहीत का? महाराष्ट्राचे सुपूत्र या नात्याने आम्ही ते आमचे आहेत असं म्हटलं. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म देशातच झालाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 1891 साली आताच्या मध्य प्रदेशात असलेल्या महू येथे झाला. पण तेव्हा मध्य प्रदेश नव्हतं. भाषिक राज्ये कधी निर्माण झाली याचा अभ्यास करावा. महाराष्ट्र, मध्य प्रदेश कधी निर्माण झाला त्यांना कळतं का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला तेव्हा देशात कोणतंही राज्य नव्हतं. भाजपमध्ये बाहेरुन काय लायकीचे लोक घेतलेत ते कळतंय. महापुरुषांचा अपमान करतायत आणि आम्हाला अक्कल शिकवताय," असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांची सडकून टीका
संजय राऊतांच्या केलेल्या विधानाबाबत बोलताना चित्रा वाघ यांनी ट्विटर अकाऊंटवरून टीका केली होती. लो कर लो बात… सर्वज्ञानी संजय राऊत म्हणताहेत बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला ...अहो... महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान, असे चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.